मुंबई - बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत मनसे नेते अभिजीत पानसे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील अशा चर्चा होत्या. मात्र, झाले उलटे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांचे शरद पवारांपासून वेगळा होणे आणि सत्तेत सहभागी होणे. या मोठ्या घडामोडी मागच्या एक वर्षात महाराष्ट्रात घडल्या आहेत. सध्या अजित पवार यांचे बंड नवीनच असताना आता पुढे नेमके काय होणार? अशा चर्चा सुरू आहेत. अशातच एक मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात समोर येते ती म्हणजे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीची.
प्रस्ताव सादर - अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेची चर्चा सुरू होती. मात्र, अचानक माध्यमांमध्ये बातमी आली ती म्हणजे मनसेच्या चित्रपट सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याच्या संदर्भातील. ही भेट म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भातील प्रस्ताव असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच शिवसेना व मनसे युतीचा प्रस्ताव या भेटीमागे असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांना दुजोरा मिळण्याचे कारण देखील तसेच आहे.
सामना कार्यालय प्रस्तावाचे ठिकाण? -अभिजीत पानसे यांनी सामना कार्यालयात खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटी मागे आपले वैयक्तिक कारण असल्याचे अभिजीत पानसे यांनी सांगितले असले तरी, या भेटीनंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे युतीचा प्रस्ताव असल्याची शंका उपस्थित केली जाते. सामना कार्यातील भेटीनंतर संजय राऊत यांनी थेट मातोश्री गाठली तर पानसे यांनी शिवतीर्थ गाठले. सामना कार्यालयातील ज्या काही चर्चा झाल्या त्या चर्चांसंदर्भात माहिती देण्यासाठी हे दोन्ही नेते आपापल्या नेत्यांच्या निवासस्थानी गेल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत.
युती होण्याची शक्यता? - 2014 पासून दोन्ही भावांनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. मात्र, 2014 पासून सुरू असलेल्या प्रयत्नांना 2023 मध्ये यश मिळू शकते असे म्हटले जात आहे. त्याचे कारण म्हणजे या दोन्ही बंधूंमधील सध्या चर्चेचा दुवा असलेले नेते. मनसेकडून अभिजीत पानसे ठाकरे गटासोबत चर्चा करत आहेत. तर, शिवसेनेकडून खासदार संजय राऊत मनसेसोबत चर्चा करत आहेत. राऊत व पानसे यांचे घरगुती संबंध आहेत. दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आजही कायम आहेत. त्यातच संजय राऊत यांची महाविकास आघाडीचे जनक अशी देखील एक ओळख आहे. परंपरागत विरोधी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना मित्र बनवण्याचे काम संजय राऊत यांनी केलेले उभ्या महाराष्ट्रने पाहिले. त्यामुळे यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात असे म्हटले जात आहे.