मुंबईMaharashtra Political Crisis Hearing :आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्यापासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपला आहे. ठाकरे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत गुरुवारी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू होणार आहे. या सुनावणीकडं राज्यातील सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यातील शिंदे सरकार राहणार की जाणार याचा फैसला सुनावणी अंती समोर येणार आहे. सुनावणीपूर्वी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मोठे वक्तव्य केलंय.
आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार : शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्यापासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होणार आहे. आमच्या पक्षाच्या वकीलांनी तसंच नेत्यांनी उद्याच्या सुनावणीसाठी पूर्ण तयारी केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीला आम्ही सहा हजार पानांच्या माध्यमातून आमचे बाजू पाठवली आहे. या सर्व बाबींचा बारकाईनं अभ्यास करून अध्यक्ष योग्य निर्णय घेतील. आमचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सकारात्मक असून लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीतून होकार मिळेल. त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा आम्हाला विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय.