महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : 50 पेक्षा जास्त जागा निवडून आणू कामाला लागा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना - अजित पवार महायुतीत आल्याचा फायदा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री वर्षा या त्यांच्या निवासस्थानी शिवसेनेतील आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादीचा गट सरकारमध्ये सहभागी झाल्यावरुन काळजी करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

Maharashtra Political Crisis
संपादित छायाचित्र

By

Published : Jul 6, 2023, 7:19 AM IST

Updated : Jul 6, 2023, 9:26 AM IST

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या आमदारांना घेऊन सत्तेत आल्याने शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यात अधिक भर टाकत आगामी निवडणुकीत 50 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, अशा सूचना दिल्या आहेत. आधीच मंत्री पदावरून शिंदे सेनेत नाराजी असताना मुख्यमंत्र्यांच्या नव्या सूचनांमुळे पदाधिकारी टेन्शनमध्ये आले आहेत.

मंत्री पद न मिळाल्याने आमदार प्रचंड नाराज :राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांचा गट सत्तेत आल्याने मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांची गच्छंती होईल अशा चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे मंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटाचे आमदार प्रचंड नाराज आहेत. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत ही नाराजी बोलून दाखवण्यात आली. अनेकांनी शिवसेना ठाकरेंना सोडणे महागात पडल्याचे सांगत, पर्यायी मार्ग अवलंबू असा सूचक इशारा दिला. अनेकांनी संताप ही व्यक्त केला. मुख्यमंत्री शिंदे यांना आमदारांच्या नाराजीची माहिती देताच, त्यांनी तातडीने नागपूरचा दौरा अर्धवट सोडून मुंबई गाठली. आमदारांच्या मनधरणीसाठी कोअर कमिटीची बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन दिले.

माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील :मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बुधवारी आमदार, खासदार, प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. दरम्यान, राजकीय घडामोडींची चिंता करू नका. बाहेर सुरू असलेल्या चर्चांकडे ही दुर्लक्ष करा. 2024 पर्यंत मी मुख्यमंत्री राहणार असून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील. निवडणुकीत 50 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा संकल्प करा. त्यादृष्टीने कामाला लागा अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिल्या. राज्यातील गावे, वाडी वस्ती पातळीवर संघटना मजबूत करा. राज्यातील जिल्हानिहाय संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना एक शिवसेना मंत्री जोडून जनतेच्या विकासांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी प्रत्येकाने झोकून ते कामाला सुरुवात करावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले.


मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न येत नाही :मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न येत नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार राहिलेले विरोधक चुकीच्या पध्दतीने प्रचार करत आहेत. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. तसेच, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक जागा निवडणूक आणण्यासाठी तयारीला लागलो आहोत, मुख्यमंत्र्यांकडून तशा सूचना मिळाल्याचे देसाई म्हणाले. मुख्यमंत्र्यांना पदावरून काढण्याचे दिवास्वप्न काही लोक पाहत आहेत. मात्र ते पूर्ण होणार नाही असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला.

शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करुन 2 जुलैला अचानक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सगळ्यांना पुन्हा एकदा धक्का दिला. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेच्या आमदार खासदारांनाही मोठा धक्का बसला. त्यामुळे शिवसेनेत बंड करुन आलेल्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली. त्यामुळे शिवसेनेच्या काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती.

आमदारांचे मंत्रिपदाचे स्वप्न धुळीस मिळाले :उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली. त्यावेळी 40 आमदारांना विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र आता अजित पवार यांनीही या युतीमध्ये सहभाग घेतल्याने एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचे मंत्री होण्याचे स्वप्न भंगले आहे. आमदार भरत गोगावले यांनी अगोदर एक भाकर होती, आता मात्र अर्धी भाकर खावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांना नाराज आमदारांच्या भावनांची जाणीव आहे, असे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादीतील बंडाची अगोदरच माहिती :बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री शिवसेनेचे आमदार आणि खासदारांची अकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाशी संबंधित तसेच राज्य विधिमंडळातील पक्षाची संघटना मजबूत करण्यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अचानक घडामोडींची माहिती आहे का, असा प्रश्न विचारला असता या बंडांची एकनाथ शिंदेंना सगळी माहिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार सरकारमध्ये का सहभागी झाले :अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट सत्ताधारी महायुतीत सामील झाला. त्याची शिवसेनेच्या आमदारांनाच मदत होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाल्यामुळे त्यांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे शिवसेनेच्या आमदारांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या इच्छुकांची व्याप्ती कमी झाली आहे. यामुळे काही आमदार नाराज झाले आहेत, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना होती. अजित पवार सत्तेत का सहभागी झाले असे आमचे कार्यकर्ते विचारत असल्याचे शिवसनेचे आमदार संजय सिरसाट यांनी सांगितले. अजित पवार गटातील नऊ मंत्र्यांच्या समावेशाने शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचे संख्याबळ 29 वर गेले असून, 14 पदे अजूनही रिक्त आहेत.

हेही वाचा -

  1. NCP Political Crisis : अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा अजित पवारांना पाठिंबा; दुपारी शरद पवारांच्या बैठकीला होते हजर
  2. Maharashtra Political Crisis : मंत्रीपद हुकले, तिकिटाचीही गॅरंटी नाही...राष्ट्रवादीच्या सत्तेतील प्रवेशाने शिंदे गटात अस्वस्थता!
Last Updated : Jul 6, 2023, 9:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details