मुंबई - सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत निकाल दिलेला नसून निरीक्षणे नोंदविली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण 7 सदस्यीय खंडपीठाकडे सोपविले आहे. सरकार टिकले आहे, पण सरकार नियुक्तीसाठीच्या प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले आहेत. अशा परिस्थितीत ठाकरे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आणखी शाब्दिक युद्ध वाढले आहेत.
राज्यपालांवर ताशेरे - राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाला निमंत्रण देण्यासारखी कोणतीही परिस्थिती नव्हती. तसेच काही आमदारांच्या राजीनाम्यामुळे तसा निर्णय योग्य नसल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले. एवढेच नव्हे तर पक्षीय राजकारणात राज्यपालांनी पडू नये, अशी कठोर टिपण्णीदेखील केली. शिंदे गटाने नेमलेले प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह हे भाजपधार्जिणे असल्याची वारंवार टीका महाविकास आघाडी सरकारकडून आजवर करण्यात आली. त्यामुळे राज्यपालांवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गटाला आयतेच कोलीत मिळाले आहे.
उद्धव ठाकरेंनी काढला नैतिकतेचा मुद्दा - उद्धव ठाकरे म्हणाले, की राज्यपालांनी शिंदे फडणवीस सरकार स्थापनेकरिता संपूर्णपणे घटनाबाह्य केले. राज्यपालांच्या अधिकाराखील नसलेले निर्णय घेतल्याचे न्यायालयाने नमूद केले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आले असते, असे सर्वोच्च न्यायलयाने सुनावणीत म्हटले. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचे म्हटले. ते म्हणाले, की, कायद्याच्या बाबतीत योग्य किंवा अयोग्य न विचार करता नैतिकतेच्या मुद्द्यावर मी राजीनामा दिला आहे. सर्व देऊनही मला विश्वासघात केल्याने पटले नव्हते. न्यायालयाने सत्यासाठी हपापलेल्या लोकांचे आज धिंडवडे काढले राज्यपालांच्या बाबतीत तर वस्त्रहरण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा, अशी त्यांनी मागणी केली.
गद्दारी केलेल्यांनी माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणणार हे मला पटले नाही. त्यामुळे त्याआधीच मी नैतिकतेने राजीनामा दिला आहे. आता जर या सरकारमध्ये नैतिकता असेल तर त्यांनीही नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा - उद्धव ठाकरे
संजय राऊतांनी केली राजीनाम्याची मागणी : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी उगाचच पेढे वाटू नये. राज्यपालांच्या सूचनेनुसार बहुमत चाचणी व व्हिप बेकायदेशीर ठरत असेल तर सर्वच बेकायदेशीर आहे. खोक्याची पापे धुवून काढायची असेल व थोडी नैतिकता असेल तर सरकारने ताबडतोब राजीनामा द्यायला हवा. यापूर्वीदेखील संजय राऊत यांनी बोलताना हे सरकार घटनाबाह्य व बेकायदेशीर असल्याचा वारंवार आरोप केला आहे.