मुंबई :शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या गटांमधील तीव्र सत्तासंघर्ष सुरू आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी वर्षा येथे गुरूवारी भेट घेतली. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना दिसले. शिंदे यांनी मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठकही घेतली होती.
१ तास चर्चा :वर्षभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार तसेच महामंडळाचे वाटप कधी होणार याबाबत शिंदे व फडणवीस गटातील आमदारांमध्ये उत्सुकता असताना अजित पवार यांची राज्याच्या सत्तेत झालेल्या एन्ट्रीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांच्या प्रवेशाने विशेष करून शिंदे गटांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता आहे. ही नाराजगी मागील दोन दिवसांपासून उघडपणे दिसून येत आहे. याच कारणाने गुरूवारी रात्री मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे आयोजित केलेल्या स्नेहभोजनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट नंदनवन बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर त्यांच्यामध्ये सुमारे १ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार व महामंडळ वाटप :या चर्चेमध्ये प्रामुख्याने अजित पवारांच्या सत्तेमध्ये झालेल्या एन्ट्रीने दुखावलेल्या आमदारांना कशा पद्धतीने शांत करावे याबाबत चर्चा झाली. त्यासोबत शिंदे गटातील अस्वस्थ आमदारांना शांत करण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार सत्तेत आल्याने शिंदे गट किंवा भाजपच्या आमदारांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे शिंदे व फडणवीस हे दोन्हीकडील आमदारांना पटवून देणार आहेत. त्यासोबत लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार व महामंडळ वाटप केले जाणार आहे. त्यामध्ये शिंदे गट त्याचबरोबर भाजप आमदारांचा समावेश केला जाईल, अशीही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदे - फडणवीस यांच्यासमोर मोठे आवाहन :अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या कारणास्तव राज्यातील महत्त्वाची खाती अजित पवार यांच्याकडे जातील अशी भीती शिंदे गटातील आमदारांसोबत भाजप गटातील आमदारांनाही आहे. या कारणाने याबाबत कशा पद्धतीने हा विषय हाताळावा व त्यांची समजूत काढावी याबाबतही चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती आहे. राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार पूर्णतः स्थिर व भक्कम परिस्थितीत असताना अजित पवारांच्या प्रवेशाने 'तीन तिघाडा काम बिघाडा' अशा पद्धतीची परिस्थिती राज्यातील सरकारची झाली आहे. अशातच सर्व आमदारांना कशा पद्धतीने शांत करता येईल, हे मोठे आवाहन शिंदे फडणवीस यांच्यासमोर आहे.