मुंबई : सरकारमध्ये अजित पवार हे सामील झाल्याने या युतीला महायुतीचे स्वरूप आले आहे. मात्र अजित पवारांच्या सत्तेतील सहभागामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस या दोघांचे टेन्शन मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे. दोन्ही गटाच्या आमदारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी स्पष्टपणे समोर येत आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस या दोघांकडून केले जात आहेत. अशातच शुक्रवारी रात्री सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तब्बल सव्वा दोन तास या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर गुरुवारी रात्री नंदनवन या निवासस्थानी दोघांमध्ये तासभर चर्चा झाली होती.
नाराज आमदारांचा प्रश्नांचा भडिमार :अजित पवारांच्या सत्तेतील सहभागामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मुद्द्यावर त्यांच्या नाराज आमदारांकडून होणाऱ्या प्रश्नाच्या भडिमाराला तोंड द्यावे लागत आहे. शुक्रवारी भाजपकडून मुंबईतील गरवारे क्लब येथे सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व नाराज आमदारांची मनधरणी करण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले. त्याचबरोबर अजित पवार यांना सत्तेमध्ये सहभागी करण्याचा निर्णय हा वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी तब्बल सव्वा दोन तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
पावसाळी अधिवेशन गाजणार :आमदारांबरोबर झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोचल्याने अनेक विषय पुढे येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मंत्रिमंडळाचा विस्तार त्यासोबत महामंडळ वाटप हा मुद्दा आहेच. परंतु अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागामुळे अनेक आमदारांनी उपस्थित केलेले प्रश्न व त्यानंतर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याकडून नाराज आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा होणारा प्रयत्न या विषयावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. सोबतच येणाऱ्या 17 जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाला सामोरे जाताना यंदा सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मागील 2 अधिवेशनामध्ये जे विरोधी पक्षनेते अजित पवार पन्नास खोके सर्व ओके म्हणत शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधत होते. तेच अजित पवार आता सरकारमध्ये सामील झाल्याने विरोधकांना सरकारची कोंडी करण्यासाठी आयते कोलीत हातात सापडले आहे.
अजित पवारांना सोबत घेण्याचा वरिष्ठांचा निर्णय :मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भाजपमधील सर्व आमदारांना मुंबईतील गरवारे क्लब येथे संबोधित केले. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, त्यासोबत भाजपचे सर्व मंत्री व विधानसभा विधान परिषदेमधील सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात फडणवीस म्हणाले की, पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा. मोदी @9 अभियानाला आणखी 10 दिवस मुदतवाढ द्यावी, संपर्क से समर्थन अभियान राज्यात जोमाने राबवा. तसेच पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम खालपर्यंत गेले पाहिजेत. संघटना जोमाने काम करीत असताना लोकप्रतिनिधींना सुद्धा त्याला तितकीच भक्कम साथ द्यावी लागेल. तुमची ताकद एकत्र करावी लागेल. समाजातील विविध स्तरातील लोकांना भेटा. विरोधी कितीही एकत्र आले तरी त्याने फायदा होणार नाही. भाजपा हा कधीच कोणाचा पक्ष फोडत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुणी पक्षात येत असेल तर त्यांना सोबत घेण्याला विरोध नाही. मोदींना साथ देण्यासाठी आपल्या सोबत येणाऱ्यांचे स्वागत करा. अजित पवार यांना पक्षात घेण्याचा निर्णय हा वरिष्ठ नेत्यांनी घेतला असल्याने त्यांचे स्वागत करा. सोबत मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळ वाटपसुद्धा आपण लवकरच करू, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
हेही वाचा -
- Meeting of BJP : सध्याच्या घडामोडीवर भाजपची आज खलबते; सायंकाळी ७ वाजता भाजपची महत्वाची बैठक
- Maharashtra Political Crisis : शरद पवारांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठावंताची जिरणार?