मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काही दिवसापासून उशिरा रात्री चर्चा घडत आहेत. त्यात आता अजित पवार यांचाही समावेश झाला आहे. सोमवारी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्षा हे निवासस्थान गाठले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खातेवाटपावरुन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा :राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर राजकारणात मोठे वादळ उठले आहे. मात्र अगोदरच शिवसेना आणि भाजपचे नेते मंत्रिपदावरुन नाराज आहेत. त्यात राष्ट्रवादी पक्षाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने भाजपसह शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे अनेक शिलेदार नाराज आहेत. त्यातच राष्ट्रवादीला कोणते खाते द्यायचे, यावरुनही बराच खल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात घडत आहे. राष्ट्रवादीला अर्थखाते देण्यावरुनही शिवसेनेच्या गटात नाराजी असल्याची चर्चा आहे.
रामदास आठवलेंनी घेतली अजित पवारांची भेट :सोमवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले यांनी राज्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे असंतुष्ट नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अजित पवारांसह सरकारमध्ये सहभागी झाल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही (एनडीए) आघाडीत सहभागी झाला. त्यामुळे विरोधी महाविकास आघाडी आणखी कमकुवत झाल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती.
काय आहे प्रकरण :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून राज्यात राजकीय भूकंप आला आहे. मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना खाते कोणते द्यायचे, यावरुन मोठी गदारोळ सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्र्यांना कोणतेही खाते अद्याप देण्यात आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणते खाते द्यायचे, यावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.
हेही वाचा -
- Ajit Pawar In Dhule Program: धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे न लावल्याने अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
- Maharashtra Political Crisis : अजित पवार अर्थमंत्री होणार असल्याच्या चर्चेने शिंदे गटात अस्वस्थता, म्हणूनच होतोय मंत्रीमंडळ विस्ताराला उशीर?