मुंबई : शरद पवार यांना धक्का देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांना जवळपास 20 ते 25 आमदारांनी पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ कमी झाले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस देखील फुटल्याने मोठी खळबळ माजली आहे. शरद पवार यांनी या राजकीय घडामोडींना विरोध दर्शवत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची हकालपट्टी करत आहेत.
पदाधिकाऱ्यांची बैठक :आगामी निवडणुका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसची विधानभवनात तर शिवसेना ठाकरे गटाची शिवसेना भवन येथे बैठक होणार आहे. काँग्रेसच्या बैठकीला राष्ट्रीय नेते एच के पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करणार आहेत.
ठाकरेंच्या बैठकीत होण्याची शक्यता : शिंदे गटाने भाजपला पाठिंबा देत राज्यात सत्ता स्थापन केले. शनिवारी या सत्तांतराला वर्ष पूर्ण होत असतानाच, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांना सत्तेत सामावून घेतले. एकंदरीत राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायला हवा, अशी मागणी मनसेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली. दादर येथे शिवसेना भवन समोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनर ही झळकले. त्यामुळे आगामी काळात दोन्ही बंधू एकत्र यावेत, अशी चर्चा ठाकरेंच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.