मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दौरा नसताना शुक्रवारी रात्री अचानक ते दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिला आठवडा संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे रात्री दहाच्या सुमारास अचानक मुंबईहून दिल्लीत पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. आपल्या कुटुंबीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांची भेट घेतली. यावेळी इर्शाळवाडी अपघातातील पीडितांच्या पुनर्वसनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यापूर्वी एनडीए बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत :मंगळवारी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी 18 जुलैला एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भाजपने आयोजित केलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. बैठकीनंतर एकनाथ शिंदे तिथून बाहेर पडले. परंतु त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुमारे अर्धा तास बैठक पार पडली होती. या बैठकीवरून शिंदे गटामध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठीकडूनच दिल्लीत बोलावल्याची चर्चा सुरू आहे.