मुंबई:अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला वायबी सेंटरमध्ये पोहोचले आहेत. यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ, अन्न नागरी पुरवठा मंत्री भुजबळ, आदिती तटकरे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. देवगिरीवरील भेट संपवून अजित पवार वायबी सेंटरमध्ये पोहोचले आहेत. विरोधकांची बैठक सोडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड वायबी सेंटरमध्ये पोहोचले.
प्रफुल्ल पटेल यांनी भेटीमागे सांगितले कारण-शरद पवारांची वेळ न मागता अचानक भेट घेतली आहे. शरद पवारांचे आशिर्वाद घेण्यासाठी भेटलो आहोत. राष्ट्रवादी एकसंध राहावा, अशी आम्ही विनंती केली आहे. त्यांनी आमची विनंती ऐकून घेतली. त्यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आमच्या मनात आजही त्यांच्याबद्दल आदर आहे. ते आमचे दैवत आहेत, असे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आपलेच सहकारी सांभाळून घ्या- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची मंत्र्याची आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी संपन्न झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. यापूर्वीच अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी करून बैठकीला हजर राहण्याबाबतचे आदेश काढला होता. त्यानुसार सर्वच आमदार देवगिरी बंगल्यावर बैठकीला उपस्थित होते. विरोधक आपले सहकारी आहेत, अशा प्रकारची बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
जयंत पाटील तातडीने वाय बी सी सेंटला रवाना- विरोधी पक्षातील घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आज विधाभवनात पार पडली. विधानभवन परिसरातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तातडीने बाहेर पडले. जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, की सुप्रिया ताईंचा फोन आला आहे. शरद पवार यांनी तातडीने भेटण्यास बोलावले असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मंत्र्यांसोबत वाय बी सेंटर येथे शरद पवार यांना भेटीला आल्याची माहिती नसल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले.
मनधरणी की आमंत्रण?दिल्लीत मंगळवारी भाजपचे मित्र पक्ष अर्थात एनडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीचा आयोजन करण्यात आलs आहे. या बैठकीला अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकू प्रतिभा पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी थेट घेतली. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार उपस्थित होते. राजकारण एका बाजूला आणि नातेसंबंध एका बाजूला माझ्या अंतर्मनाने काकूंची भेट घेण्यास सांगितल्याने भेट घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का? हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीचा गट सत्तेत सहभागी-राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार यांनी सत्तेत सहभाग गेल्यानंतर काही दिवसांपासून राष्ट्रवादीत धुसफूस सुरू आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीत उभी फूट असल्याचे समोर आले. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्यावर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल व अजित पवार यांनी टीका करत आव्हान दिले. तर दुसरीकडे शरद पवार यांनी पुन्हा पक्ष नव्याने उभा करण्यासाठी राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे जाहीर केले. त्यावर अजित पवार यांनी उत्तरसभा घेण्याचे जाहीर केले. अजित पवार गटाने आपला फोटो वापरू नये, अशा सूचनादेखील शरद पवार यांनी केल्या आहेत. मात्र, शरद पवार आपले नेते आहेत, असे सांगून राष्ट्रवादीचे बहुतेक नेते शरद पवारांचा फोटो वापरत आहेत.
येवल्यात पहिली सभा- शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्यात येवला येथे पहिली सभा घेत छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. यापुढे अशी चूक करणार नाही, असे सांगून येवल्यातील जनतेची माफी मागितली. त्यावरून छगन भुजबळ यांनी ओबीसी असल्यान पवार यांनी सभा घेतली का असा पत्रकार परिषदेत सवाल केला. शरद पवार कुठे कुठे माफी मागणार आहेत, असा टोला देखील लगावला.
राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांना मिळाली मलईदार खाती- अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर अर्थमंत्रीपदाचा आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीदेखील भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपावरून काही बैठका झाल्या आहेत. शिंदे गटातील नाराज आमदारांनी विरोध करूनही अजित पवारांना अर्थमंत्री पद मिळाले आहे. एवढेच नव्हे तर शिंदे गटाकडे असणारे महत्त्वाचे मंत्रीपददेखील मिळाली आहेत. एकंदरीत शिंदे गटावर राष्ट्रवादी गटाने कुरघोडी केल्याचे दिसत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना पूर्वी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या आठ मंत्र्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहचल्याने सर्वांच्या भुवया उंचाविल्या आहेत.
हेही वाचा-
- Monsoon Session 2023: पावसाळी अधिवेशन 'या' मुद्द्यांवरून ठरणार वादळी; पक्षांच्या फोडाफोडीनंतर विरोधक आक्रमक
- Monsoon Session 2023: राष्ट्रवादीत दोन्ही गटाकडून व्हिप जारी केल्याने आमदारांमध्ये संभ्रम; विधीमंडळातही विधानसभा अध्यक्षांसमोर असणार 'हा' पेच
- Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवार श्रद्धास्थान, प्रेरणास्थान; त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात - अजित पवार