मुंबई - फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा जीव मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाच्या सतर्कतेमुळे वाचला. धुळ्यातील ज्ञानेश पाटील हा तरूण फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तो व्हिडिओ फेसबुकच्या आयर्लंडमधील अधिकाऱ्यांनी पाहिला. त्यांनी तात्काळ मुंबई सायबर पोलिसांना याची माहिती दिली. यामुळे त्या तरूणाचा जीव वाचला.
फेसबुक कडून मिळाली होती माहिती
फेसबुक लाइव्ह करीत गळा चिरणाऱ्या या युवकाचा सर्व तपशील सायबर पोलिसांनी धुळे पोलिसांना दिला. ज्यात त्याचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. फेसबुकवर तीन मोबाईल क्रमांक दिलेल्या ज्ञानेश पाटील याचे तीनही मोबाईल नंबर हे बंद होते. मुंबई पोलिसांनी याची माहिती तातडीने धुळे पोलिसांना दिली. त्यानंतर केवळ पाच मिनिटात धुळे पोलिसांनी त्या युवकाचे घर गाठले. त्यावेळी त्यांना तो युवक आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास आले. या युवकाला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
या अगोदर दिल्लीतून मुंबईत आलेल्या एका व्यक्तीने फेसबुकसारख्या सोशल माध्यमावर, काही व्हिडिओ शेअर करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देखील फेसबुकच्या आयर्लंडमधील अधिकाऱ्यांनी याची सूचना दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांना कळवली. काही वेळातच मुंबई पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेऊन त्यास आत्महत्या करण्यापासून रोखले होते.
8 ऑगस्ट 2020 रोजी फेसबुकवर एका व्यक्तीने आत्महत्या करण्याच्या संदर्भांत काही व्हिडिओ शेअर केले असता, आयर्लंडमधील फेसबुक कार्यालयात व्हिडिओ मॉनिटर करणाऱ्याला याबाबत शंका आली. त्याने तात्काळ दिल्ली सायबर पोलिसांना या संदर्भात संबंधित व्यक्तीचा आयपी अँड्रेस व रजिस्टर्ड मोबाईल नंबर देत याची माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा त्यांना दिल्लीतील एका महिलेच्या नावावर हा नंबर रजिस्टर असल्याचे दिसून आले. तेव्हा ते मोबाईल क्रमांकाच्या पत्त्यावर पोहोचले. मात्र त्यावेळी या महिलेने, हा मोबाईल क्रमांक तिचा जरी असला तरी या नंबरवरील फेसबुक अकाउंट तिचा पती वापरत असल्याचे सांगितले. सदर महिलेचा पती मुंबईत असून त्याचा मुंबईतील पत्ता महिलेला माहित नव्हता.