मुंबई- भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. याबाबत माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. खडसे यांच्या पक्ष प्रवेशामुळे राज्यात भाजपला मोठा धक्का बसला असून दुसरीकडे राष्ट्रवादी मात्र यामुळे मजबूत होण्यास मदत होणार आहे. खडसे यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा केली असून त्यानुसार त्यांनी पक्षात प्रवेश करण्यास संदर्भासाठी सर्व भूमिका स्पष्ट केली असून त्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता हा प्रवेश होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी भाजपचा राजीनामा दिला असल्याचे फोनवरून आपल्याला सांगितले. यामुळे हा प्रवेश होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
खडसे यांच्यासोबत त्यांचे नेतृत्व स्वीकारणारे इतर नेते पक्षात येणार आहेत, त्यामुळे काही आजी, माजी आमदार सुद्धा असू शकतात, त्यांची नावे उद्या दिली जातील, असेही पाटील यांनी सांगितले. खडसे यांच्या सोबतच राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपत गेलेल्या तीन चार मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे, असा दावाही जयंत पाटील यांनी यावेळी केला. खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे आम्हाला एक जाणकार आणि अनुभवी नेता मिळणार असून त्याचा फायदा पक्ष बळकटीसाठी होईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास...
भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्या नेत्यांचा पक्ष प्रवेश जाहीररीत्या केला जाणार असून त्यासाठी कुठेही विषय अंधारात ठेवला जाणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, हा प्रवेश कधी होईल याविषयीची उत्सुकता राष्ट्रवादी सोबतच भाजपमधील खडसे समर्थकांना लागली होती. याच पक्ष प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत मागील महिन्यात चर्चा केली होती. त्या चर्चेदरम्यान काही नेत्यांनी खडसे यांना पक्षात घेण्याला विरोध दर्शवला होता तर बहुतांश पदाधिकाऱ्यांनी खडसे आल्याने पक्ष मजबूत होईल अशी सूचना केली होती. त्यानंतर अनेकदा खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चर्चा सुरूच होत्या. त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे यांचा भाजपत जाहीररित्या प्रवेश होणार आहे.
खडसे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव आणि त्या परिसरात बळकट होणार असली तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वेळोवेळी कोंडीत पकडण्यासाठी खडसेंचा मोठा वापर महाविकास आघाडीकडून केला जाण्याची शक्यता आहे. यासाठीच खडसेंना तातडीने विधान परिषदेवर घेऊन त्यांना ग्रामविकास अथवा राष्ट्रवादीकडे असलेले कामगार मंत्रीपद दिले जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या मंत्रीपदामध्ये बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.