महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शॅडो मंत्रिमंडळ : मनसेच्या नव्या भूमिकेला जनतेचा कसा प्रतिसाद? - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंजिनाच्या बदलेल्या दिशेचा नेमका कितपत लाभ होईल. हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

शाडो मंत्रिमंडळ
शाडो मंत्रिमंडळ

By

Published : Mar 10, 2020, 11:02 AM IST

Updated : Mar 11, 2020, 7:35 AM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या राज्य कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी मनसेने शॅडो मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. मात्र, हा केवळ 'इव्हेंट' न राहता खऱ्या अर्थाने यावर काम झाल्यास पक्षाला पुन्हा जनाधार मिळू शकेल. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंजिनाच्या बदलेल्या दिशेचा नेमका कितपत लाभ होईल. हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

शॅडो मंत्रिमंडळ : मनसेच्या नव्या भूमिकेला जनतेचा कसा प्रतिसाद?

मराठी अस्मिता आणि परप्रांतीयांच्या मुद्यावर 2006 साली मनसेने रस्त्यावर उतरत पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात मनसेला मोठा जनाधार मिळाला. मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाणे या भागात जनतेने मराठीच्या मुद्यावर पक्षाला उचलून घेतले. 2009 च्या लोकसभेत मनसेच्या उमेदवारांनी लाख-लाख दोन लाख मते घेतली. तर 2009 च्या विधानसभेत 13 आमदार निवडून आले. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही मनसेने दबदबा निर्माण केला होता. मात्र, पुढच्या काळात मनसेचा आलेख घसरला. कार्यकर्त्यांची घडी विस्कटली, 2014 च्या निवडणुकीत जुन्नरमधून केवळ एक आमदार निवडून आला. तर मुंबई महापालिकेत सात नगरसेवक निवडून आले. या विस्कटलेल्या घडी मागे, वारंवार बदललेली भूमिका ही काही अंशी जबाबदार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांचे आहे.

हेही वाचा -'हिंदुत्व आमची शाळा; या शाळेत कोणीही येऊन आम्हांला शिकवू नये'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2014 साली गुजरातचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे गोडवे गायले. मोदी यांना पाठिंबा देत, लोकसभा निवडणूकही लढवली नाही. याच निवडणुकी आधी राज ठाकरे यांनी मुंबईतल्या चुना भट्टी येथील सभेत स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. मात्र, काही दिवसातच ठाकरे यांनी आपला शब्द मागे घेतला. यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जनतेने मनसेला साफ नाकारल्याने दिसून आले.

मनसेचा दिवसेंदिवस प्रभाव कमी होत होता. तर या दरम्यानच 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाली. या निवडणुकीत 2014 च्या उलट राज ठाकरे यांनी भूमिका घेतली. "लाव रे तो व्हिडीओ" म्हणत त्यांनी महाराष्ट्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रान उठवले. मात्र, याचा कोणताही फरक लोकसभेच्या निकालावर झाला नाही. महाराष्ट्रात मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नसली तरी भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. त्यांनतर मोदी यांच्या विरोधकांनी मतदान यंत्रात अर्थात ईव्हीएम मशीनमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याची टीका केली. त्यावेळी राज ठाकरे यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिळवला. केवळ सूरच मिसळला नाही तर या मोहिमेचे नेतृत्व करण्याची धमक ही दाखवली. ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेटही घेतली. मात्र, हा ओघ त्यांना कायम राखता आला नाही.

हेही वाचा -चुकीचं काम केल्यास वाभाडे, चांगल काम केलं तर कौतुकही - राज ठाकरे

पुढे राज्याच्या सत्ता संघर्षात शिवसेनेने भाजपला धोबी पछाड देत, आपले पारंपरिक विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. आता शिवसेनेने वेगळ्या विचारधारेच्या पक्षांशी घरोबा केल्याने, हिंदुत्वादी विचारधारेपासून शिवसेना दूर गेली असल्याचे चर्चिले जात असतानाच ही पोकळी भरून काढण्यासाठी मनसेने थेट हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली. अगदी झेंड्याचा रंग ही बदलला. मात्र, या बदलेल्या भूमिकेचा जनतेने किती स्वीकार केलाय याचे परिमाण निवडणुकी शिवाय दुसरे कोठे असू शकत नाहीत. पुढच्या महिन्यात औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत येणारे निकाल मनसेचे भवितव्य ठरवतील यात शंका नाही...

Last Updated : Mar 11, 2020, 7:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details