मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असून दररोज सभागृहामध्ये दररोज वाद समोर येत आहेत. विशेष करून आमदारांना अनेकदा गैरवर्तन केल्यामुळे विधानपरिषदेमध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून कडक शब्दात समज दिली जात आहे. कालही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक रंगली. अखेर मार्शलला बोलावून गोपीचंद पडळकर यांना सभागृह बाहेर काढा, असे उपसभापतींना सांगावे लागले. त्याचबरोबर आज पूर्ण दिवस सभागृहात पडळकरांना बोलू न देण्याची शिक्षा देण्यात आली आहे.
काय झाले होते?विधानपरिषदेमध्ये मध्यंतरानंतर पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू होत्या. या दरम्यान बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वेळेचे बंधन घालून त्यांना बोलण्यास रोखले. त्यावेळी पडळकर यांनी उपसभापतींवर गंभीर आरोप केले. पडळकर यांनी आपल्या हातातील कागदपत्रे फाडून नीलम गोऱ्हे यांचा निषेध केला. तुम्ही सभागृहाचे नियोजन नीट ठेवत जा, आम्ही बोलायला लागलो की तुम्ही लगेच बेल वाजवतात. नेहमी सभागृहात तुम्ही मला जाणीवपूर्वक बोलू देत नाहीत, असा गंभीर आरोप पडळकरांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर केला.