मुंबई : राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणच्या नद्यांना पूर आले आहेत. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. आज मुंबईत मुसळधार पाऊस होणार असून हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. हा रेड अलर्ट बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून ते 27 जुलै दुपारपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरी भागासाठी लागू आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने हवामान विभागाच्या हवाल्याने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान पावसाच्या रेड अलर्टमुळे ठाण्यातील अजित पवारांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या एकूण 13 तुकड्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
पुढचे 12 तास महत्त्वाचे : मुंबईत आज मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर गरज असेल तरच घराबाहेर पडा,असे आवाहन सुद्धा मुंबईकरांना देण्यात आले आहे. प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात येत आहे. रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांनादेखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आज उत्तर महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर कायम: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेला सरकू लागले आहे. परिणामी पुढील 2 दिवस राज्यातील बहुतेक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आजसाठी कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मान्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम राहणार असल्याने किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम असेल.