मुंबई - विधान परिषदेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अपेक्षाप्रमाणे शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, भाजपचे प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे हे उमेदवार विजयी झाले आहेत.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सोमवारी सकाळी मतदानाला ( Voting for ten seats in the Legislative Council ) सुरुवात झाली. पाच वाजता मतदानची वेळ संपली तेव्हा 285 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क ( 285 MLAs exercised their right to vote ) बजावला. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात होते. तर भाजपाने आपल्या पाच उमेदवारांना रिंगणात उतरविले होते. दहा जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने मतदान घ्यावे लागले.
मलिक देशमुखांची याचिका फेटाळली -विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, दुपारनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावतीने मतदान करू देण्यासंदर्भात विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. याचिका फेटाळतानाच सर्वोच्च न्यायालयाने देशमुख आणि मलिक यांना विचारले की, न्यायालयाने परवानगी दिल्यास आता मतदान करता येईल का? असा सवालही त्यांना केला. या दोघांनीही याआधी मुंबई उच्च न्यायालयात मतदानासंदर्भात याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला मतदान करता येणार नाही, असे म्हणत त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. तिथेही मलिक आणि देशमुखांच्या हाती निराशाच आली. मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिला तोच निकाल कायम असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. यावेळी मलिक आणि देशमुखांच्या वकिलांनी वेगवेगळे दाखले देऊन त्यांची बाजू मांडली होती. मात्र सर्वोच्च न्यायालायने तुम्ही उशिरा का याचिका दाखल केली, असे म्हणत त्यांना फटकारले आहे.