मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या अनुषंगाने राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 27 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 12.30 वा. आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कोविड-19 निर्बंधांचे पालन करत मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे.
या समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.
कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध
हुतात्मा दिनानिमित्त १७ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले होते. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादनात केला. कर्नाटक सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी व निर्धारानं लढत रहाणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
शेवटच्या क्षणा पर्यंत लढा देणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हणाले होते, की महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..! बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धाराने लढत राहणे, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. वर्ष 1956 मध्ये बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरू आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीनं लढतील. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, दि. 18 जानेवारी 1956 रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे १० सुपुत्र शहीद, तर अडीचशेहून अधिक जण जखमी झाले होते.