मुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेल्या 66 वर्षापासून चिघळतो आहे. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या परिसरातील 826 मराठी गावे भाषिक अन्यायाने गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. कर्नाटकमध्ये मिळणाऱ्या मूलभूत सुविधा या चांगल्या आहेत. मात्र, गटारे आणि पाणी म्हणजे विकास नाही आम्हाला आमचा भाषेतून विकास हवा आहे या मागणीसाठी अव्यातपणे संघर्ष सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या संघर्षाची धार बोथट झाली आहे. (Maharashtra Karnataka Border Dispute) त्याची कारणे म्हणजे नवी पिढी ही कर्नाटकशी आणि कानडी भाषेची जुळवून घ्यायला तयार झाली आहे. कानडी संस्कृतीचे अतिक्रमण होत असल्याने मराठी भाषिक संस्कृती नामशेष होत चालली आहे. त्यामुळे भाषिक वाद अलीकडे कमी दिसू लागल्याने विकासाच्या मुद्द्यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. तरीही एक मोठा वर्ग मराठी भाषेत गाव महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडतो आहे.
सीमावर्ती गावांचा काय आहे प्रश्न -महाराष्ट्राला गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांची सीमा लागून आहे. मात्र, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी गावात सीमेलगतच्या अनेक गावांमध्ये अद्यापही विकास झालेला नाही. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने मिळतात. महसुली कामकाजाच्या सुविधासुद्धा अधिक सोयीस्कर आहेत. (What is borderism of Maharashtra Karnataka) त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांनी म्हैसाळ पाणी योजनेचे पाणी आम्हाला देण्यात यावे अन्यथा कर्नाटकमधील अलमट्टी धरणाचे पाणी देण्यासाठी कर्नाटक वर दबाव निर्माण करावा जर तेही शक्य नसेल, तर आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. या गावांवर कोणताही भाषिक अन्याय नाही. मात्र, स्थानिक पाणीटंचाईचा प्रश्नावरून आणि विकासावरून ही गावे संतप्त झालेली आहेत.
अक्कलकोट मधील गावांचाही उठाव -सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्या गावात विकासाच्या गोष्टी येत नसल्याने आम्ही कर्नाटकात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या गावांमध्ये पाणी तसेच अन्य सुविधा आणि शासकीय योजना योग्य प्रमाणात अंमलबजावणी होत नसल्याचा गावांचा आरोप आहे. यामध्ये शेगाव, कोर्सेगाव, कांदेवाडी खुर्द, देवीकवठे, शावळ, हेळी आलगे, मंगरूळ आणि दर्शन या गावांचा समावेश आहे त्याचप्रमाणे तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या गावातील मूलभूत प्रश्न गेली कित्येक वर्षांपासून सुटलेले नाहीत. तेलंगणातील गावे आणि तेथील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा पाहता आम्हालाही तेलंगणात जाण्याची परवानगी द्यावी अशी नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली धर्माबाद तालुक्यातील सुमारे 30 गावांनी मागणी केली आहे.
काय आहे सीमा वासियांच्या मागण्या? -शेतीला 24 तास मोफत वीज पुरवठा, मुलीच्या लग्नाकरिता लक्ष्मी कल्याण योजना, शेतकऱ्यांना प्रति एकर बारा हजार रुपये दरवर्षी दिले जावेत, खते आणि कीटकनाशके यांच्यावर 50 टक्के अनुदान मिळावे, घरकुल योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत घर बांधून मिळावे, मागणी करेल त्याला शेळ्या मेंढ्या दिल्या जाव्यात, मागासवर्गीयांना व्यवसाय करताना दहा लाखांचे अनुदान देण्यात यावे, तर दिव्यांगांना दरमहा तीन हजार रुपये अनुदान मिळावे अशी मागणी सीमा वासीयांनी केली आहे.