मुंबई :महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद (Maharashtra Karnataka Border Dispute) गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना आता बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणार असल्याचे बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा उफळून येण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्हा, गोकाक जिल्हा, चिकोडी जिल्हा असे विभाजन करण्याचा प्रस्ताव असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. बेळगाव हा कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना दुसरीकडे बेळगाव विभाजनाच्या मुद्द्यामुळे सीमा प्रश्न अधिकच चिगळू शकतो.
जैसेथे परिस्थिती ठेवा :यावर बोलताना मंत्री, शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा सीमावर्ती भाग आहे. त्या भागातील 70 ते 80 टक्के नागरिक मराठी भाषिक आहेत. आम्ही वेळोवेळी त्या भागांनाही भेट दिली आहे. आम्हाला महाराष्ट्रात सामील व्हायचे आहे, अशी तेथील नागरिकांची जनभावना आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन महिन्यांपूर्वी कर्नाटक, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून सीमाप्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तसेच केंद्र सरकार अजूनही तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत कर्नाटक सरकारने एका जिल्ह्याचे तीन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देखील जैसेथे परिस्थिती कायम ठेवावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारला हस्तक्षेपाचा आग्रह धरू, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.