महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Janata Dal : महाराष्ट्र जनता दल सेक्युलर पक्ष अखेर सपात विलिन, देवेगौडांच्या भाजपाबरोबर युतीला विरोध

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 8:03 PM IST

Maharashtra Janata Dal : महाराष्ट्र जनता दल सेक्युलर पक्ष अखेर सपात विलिन झाला आहे. आज याबाबत निर्णय घेण्यात आला. भाजपाशी युती करण्याच्या देवेगौडा यांच्या निर्णयाला महाराष्ट्र जनता दलाचा विरोध आहे. त्यातून हा निर्णय घेण्यात आला.

Maharashtra Janata Dal
Maharashtra Janata Dal

मुंबई Maharashtra Janata Dal : महाराष्ट्र जनता दल सेक्युलर पक्ष अखेर सपात विलिन झाला आहे. भाजपाशी युती करण्याच्या देवेगौडा यांच्या निर्णयाला महाराष्ट्र जनता दलाचा विरोध आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी जनता दल सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्या मान्यतेनं भाजपाशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपाशी युती करण्याची भूमिका महाराष्ट्रातील जनता दल सेक्युलर कार्यकर्त्यांना मान्य नाही. महाराष्ट्र जनता दल सेक्युलर ठाम विरोध आणि तीव्र निषेध व्यक्त करीत असल्याची माहिती जनता दलाचे नेते प्रताप होगाडे यांनी दिली. पुणे येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र जनता दल सेक्युलरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजवादी पार्टीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाराष्ट्रातील जनता दल सेक्युलर या पक्षाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे.


पुण्यात झाला निर्णय - महाराष्ट्रातील जनता दल सेक्युलर पक्षाचे बहुतांशी कार्यकर्ते राष्ट्र सेवा दल व समाजवादी पक्ष या विचारसरणीमधून आलेले आहेत. महाराष्ट्र प्रदेश जनता दलाला साने गुरुजी, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, बॅ. नाथ पै, मधू दंडवते, प्रमिला दंडवते, बापूसाहेब काळदाते, मृणाल गोरे, निहाल अहमद, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस अशा अनेक नेत्यांच्या विचारांचा संपन्न वारसा आहे. राज्यातील बहुतांशी कार्यकर्ते याच विचारसरणीचे, धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ विचारधारेचे आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील संविधान विरोधी, लोकशाही व जनहित विरोधी, मनुवादी फॅसिझमच्या पुरस्कर्त्या धर्मांध व जातीयवादी भाजपा संघ प्रणीत राजकारणाचा, राज्य आणि केंद्र सरकारचा व अशा सर्व प्रवृत्तिंचा विरोध करणे आणि समताधिष्ठित समाजवादी समाजरचनेसाठी सातत्याने जन आंदोलने करणे व जनतेच्या जिव्हाळ्याच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी लोकलढे करणे ही जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र पक्षाची व कार्यकर्त्यांची भूमिका प्रथमपासूनच होती, आजही तीच आहे आणि पुढेही तीच कायम राहील. आजही त्याच भूमिकेतून महाराष्ट्र जनता दलाची ही सभा देवेगौडा यांच्या भाजपाशी युती करण्याच्या निर्णयाचा पूर्णपणे विरोध व निषेध करीत आहे व महाराष्ट्र जनता दल अशा कोणत्याही युतीत वा निर्णयात कोणत्याही परिस्थितीत कदापिही सहभागी होणार नाही अशी स्पष्ट व ठाम भूमिका जाहीर करीत आहे. असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे होगाडे यांनी सांगितले.


पक्षाच्या घटनेच्या विरोधात भूमिका - भाजपाशी युतीचा राष्ट्रीय नेतृत्वाचा निर्णय हाच पक्षाच्या घटनेच्या विरोधी आहे. त्यामुळेच कर्नाटकात प्रचंड मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र सुरू झालेले आहे. केरळमधील जनता दलाने डाव्या पक्षांच्या आघाडीबरोबरच केरळ सरकारमध्ये राहण्याचा ठाम निर्णय जाहीर केलेला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यातील पक्ष संघटनांनी देवेगौडा यांच्या या भूमिकेला स्पष्ट विरोध केला आहे. आणखी काही अन्य राज्यांतील पक्ष संघटनाही त्याच मार्गावर आहेत. देवेगौडा यांच्या भाजपाशी युती या भूमिकेच्या विरोधात देशातील जनता दलाच्या विविध राज्य संघटनांनी राष्ट्रीय पातळीवर सामूहिक विचारविनिमय सुरु केलेला आहे.



पक्षाशी संबंध तोडणे अपरिहार्य -देवेगौडा यांनी जाहीर केलेली युती ही लोकसभा निवडणुकीसाठीची राष्ट्रीय पातळीवरील आघाडी आहे व ते अधिकृतरीत्या एनडीएमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचे गंभीर परिणाम सर्व राज्यांतील धर्मनिरपेक्ष जनता दल संघटना, कार्यकर्ते आणि मतदारांवर होणार असल्याने याचा विचार करता महाराष्ट्र प्रदेश जनता दल पक्ष संघटनेला राष्ट्रीय पक्ष नेत्यांशी व पक्षाशी संबंध तोडणे अपरिहार्य झालेले आहे. राज्यातील सर्व पक्ष कार्यकर्त्यांची पुढील वाटचाल एकत्रित वएकसंध व्हावी यासाठी अन्य समविचारी पक्षांपैकी योग्य पर्याय शोधणे आणि निश्चित करणे आवश्यक आहे. राज्यातील विविध प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यासंदर्भात या बैठकीत विचार मांडले आहेत. समान विचारसरणी असलेले राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष व तत्सम पर्याय सुचविले आहेत. तथापि त्यासंदर्भात सदर पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यस्तरीय नेते यांच्याशी समक्ष साधकबाधक चर्चा करणे व त्यानंतर अंतिम निर्णय करणे आवश्यक होते. त्यानुसार एकमताने समाजवादी पार्टी या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अबू असीम आझमी यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेशजी यादव यांची समक्ष भेट घ्यावी असाही निर्णय घेण्यात आला असल्याचं समाजवादी पक्षाचे नवनियुक्त प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यानी सांगितलं.

हेहा वाचा..

  1. Abu Azmi on Love Jihad हिंदू मुस्लिम का साथ छूट जायेगा, तो हिंदुस्तान तूट जायेगा -अबू आझमी
  2. Income Tax Raid On Abu Azmi : अबू आझमींच्या निकटवर्तीयांवर टाकलेल्या छाप्यात सापडलं 'मोठं' घबाड, विनायक ग्रुपची 250 कोटीची मालमत्ता जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details