मुंबई- बँकेच्या एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यात २०१८-१९ या वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचे आरबीआयच्या एका अहवालातून समोर आले आहे. एटीएमद्वारे एक लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची आकडेवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून २३३ गुन्हे या वर्षात घडले आहे. यात तब्बल ४ कोटी ८१ लाख रूपये एटीएम मशीनच्या माध्यमातून परस्पर लुबाडण्यात आले आहे.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजधानी दिल्लीत २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात तब्बल १७९ एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून तब्बल २ कोटी ९० लाख रुपये लुटण्यात आले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्य असून या राज्यात ३ कोटी ६३ लाख रुपये एटीएम सेंटरमधून लुटण्यात आले आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश व त्रिपुरा सारख्या राज्यात एटीएम फसवणुकीचा (१ लाखांवरील) कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे समोर आले आहे.
अशी होते एटीएम सेंटरमधून बँक ग्राहकांची लूट
देशातील विविध राज्यातील बँकांच्या एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये एटीएम कार्डाच्या स्वाईप मशीनवर स्कीमर लावून बँक ग्राहकांचा डेटा (माहिती) चोराला जातो. मिळालेला डेटा बनावट एटीम कार्डवर टाकून हातोहात एटीएम हॅकर पीडित बँक ग्राहकाच्या खात्यातून पैसे लुबाडत आहेत.