मुंबई:केंद्रीय सूक्ष्म आणि लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या दरम्यान राज्यातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांना कशा पद्धतीने मदत करता येईल. राज्यात अधिकाधिक रोजगार निर्मिती कशी होईल राज्यातील उद्योगांचे प्रमाण कसे वाढवता येईल आणि आत्मनिर्भर भारत कसा होईल या दृष्टीने ही चर्चा सफल झाल्याचे राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्गात उभारला जातोय युनिट:'एमएसएमई'च्या कार्यालयाचे मुंबई साकीनाका येथे असलेल्या जागेवर आरक्षण आहे. ते हटवण्यासही मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान 'एमएसएमई' अंतर्गत सिंधुदुर्गात एक युनिट उभारला जात आहे. यासाठी लागणाऱ्या प्रकल्पाच्या जमिनीची किंमत म्हणून 13 कोटी रुपये होती. ही रक्कमही आजच्या बैठकीत शिंदे यांनी माफ केल्याचे राणे यांनी सांगितले.
90 हजार लघु उद्योगांची नोंदणी: राज्यातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना केंद्र सरकारच्या वतीने मदत करण्यात येते. राज्यात सुमारे 90 हजार लघुउद्योगांची नोंदणी झाली असल्याची माहिती राणे यांनी यावेळी दिली. कोरोना काळात शेकडो उद्योग बंद झाले. मात्र, अशा उद्योगांना केंद्र सरकारकडून कर्ज योजना जाहीर करण्यात आली. पाच लाख कोटी रुपयांची ही कर्ज योजना होती. यापैकी 3 लाख 76 हजार कोटी रुपयांची कर्जे विभागाने वितरित केली. या कर्ज योजनेतील किती रक्कम राज्यातील उद्योगांना दिली गेली याबाबत विचारले असता आपल्याकडे त्या संदर्भातील आकडेवारी नसल्याचे केंद्रीय मंत्री राणे यांनी सांगितले. यासोबतच उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला.
रेल्वेमंत्र्यांनी आकडे लपविले नाहीत:काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रेल्वे अपघातावरून केंद्र शासनावर केलेल्या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. आमचे रेल्वेमंत्री हे काहीही आकडे लपवणारे नाहीत. ते योग्यच आकडे देणारे आहेत. ज्यांचे लग्न झाले नाही त्यांचा राज्याभिषेक होणे शक्य नाही, असा टोलाही राणेंनी लगावला.