मुंबई - सध्या महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सरकारने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे पालन सर्व गणेश मंडळांनी करावे, विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी किंवा २०२१च्या भाद्रपद महिन्यात करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यावर्षीचा गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना -
1) सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासनाची स्थानिक धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
2) कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच न्यायालयाने दिलेले आदेश आणि महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासनाच्या मंडपाबाबतच्या नियामांचा विचार करुन मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भंपकपणा नसावी.
3) सार्वजनिक मंडळासाठी जास्तीत जास्त ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मूर्ती असाव्यात.
4) यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तींचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून गणेशाचे आगमन व विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळता येऊ शकते. यामुळे स्वतःचे व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल.
5) उत्सवासाठी देणगी व वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावे.