मुंबई- अभिनेत्री कंगना रणौत प्रकरणावरुन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून धमकीचे फोन येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृत्ताला खुद्द अनिल देशमुख यांनीच दुजोरा दिला आहे.
धमकी देणाऱ्या व्यक्तींनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कंगना रनौतपासून दूर राहण्यास सांगितले. तसेच कंगनाविरोधातील कारवाई थांबवण्याची सूचना केली. आम्ही जे सांगतो आहे ते आत्ताच लक्षात घ्या आणि सुधरा, नाही तर परिणाम वाईट होतील, असे धमकी देणाऱ्या व्यक्तींकडून सांगण्यात येत असल्याचे समजते.
बुधवारी सकाळी सहा वाजता अनिल देशमुख यांना धमकीचे दोन फोन कॉल आले. त्याआधी तीन फोन कॉल आले असून, यातील एक फोन अनिल देशमुख यांच्या नागपूर कार्यालयात करण्यात आला होता. तर दोन फोन कॉल हे मुंबईतील कार्यालयात करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.