मुंबई -राज्यात कोरोनामुळे पोलीस दलातील जवळपास 1007 हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी संक्रमित झाले आहेत. तसेच सध्या सुरू असलेला रमजान व येणारा ईद सण याच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सध्या राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या मिळाव्यात, अशी मागणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.