मुंबई- कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमार) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल ) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले.
लसी संदर्भात प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, 'लसीबाबत आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारपणे महत्वाच्या १३ ते १४ रुग्णालयामध्ये या लसीबाबत क्लिनीकल ट्रायल्स करण्याच्या सूचना दिल्या आहेत.'
लसीच्या ७ जुलै पर्यंत क्लिनीकल ट्रायल्स व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत प्री-क्लिनीकल आणि क्लिनिकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन पहिली भारतीय बनावटीची लस तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. भार्गव यांनी सांगितल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.