बेळगाव- महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी आज(शुक्रवारी) दुपारी १२ वाजता ताब्यात घेतले. पोलिसांची परवानगी न घेता महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांना धक्काबुक्कीही केली.
कर्नाटकची दडपशाही.. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात गेले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी १७ जानेवारी रोजी येथील हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. या अभिवादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्री पाटील शुक्रवारी बेळगावात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नेते येऊ नयेत यासाठी कर्नाटक पोलीस महामार्गावर वाहनांची तपासणी करीत होते. पण त्यातूनही राजेंद्र पाटील यड्रावकर बेळगावात पोचले व ते हुतात्मा चौकात गेले. तेथे अभिवादान सुरू असतानाच त्यांना पोलिसांनी अडविले.
पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली व अटक केली. यावेळी तेथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.