मुंबई- गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांच्या २ वाहनांवर मोठा हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत १६ जवानांना वीरमरण आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज (बुधवारी) संध्याकाळी राजभवन येथील चहापान व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केला आहे.
राज्यपालांनी महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवन येथे मान्यवर निमंत्रितांसाठी तसेच विविध देशांच्या प्रतिनिधींसाठी चहापान तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, आज घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
काय आहे घटना -
मंगळवारी मध्यरात्री दादापूर येथे नक्षलवाद्यांनी तब्बल २७ वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर नक्षल्यांनी आज पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडवला. यामध्ये १६ जवान जवानांना वीरमरण आले आहे.
महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना अशी नक्षली हल्ल्याची घडल्याने पोलीस विभागावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल २७ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शिघ्र प्रतिसाद पथकातील जवान टाटाएस या खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. त्यावेळी कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाच्या अलिकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडवला.
मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये शांततेत सहभाग नोंदवला होता. लोकांमध्ये मतदान न करण्याचे आवाहन केल्यानंतरही लोक मतदार केंद्रांपर्यंत पोहोचले. याचा राग नक्षलवाद्यांच्या मनात होता. त्यातूनच हा हल्ला घडवला असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकार कठोर पावले उचलेल असेही मुनगंटीवार म्हणाले.