मुंबई - राज्यातील कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी विनंती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. मात्र त्यालाच आक्षेप घेत आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातील सर्व अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देणारे एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षांवर राज्यात येत्या काही दिवसांत गोंधळाचे वातावरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांशी चर्चा करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी युजीसीला दिलेल्या पत्रानंतर राज्यात काल भाजपप्रणित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची मागणी केली होती. त्याची राज्यपालांनी तत्काळ दखल घेतली. तर, राज्यातील इतर विद्यार्थी संघटनांनी सामंत यांच्या निर्णयाचे स्वागत करत या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या सूचना करतानाच राज्यपालांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाला परीक्षा रद्द करण्यासंदर्भात केलेल्या मागणीलादेखील विरोध दर्शवला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्याची सूचना केली आहे. तर सामंत यांनी केलेली मागणी म्हणजे युजीसीच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधी असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. तर, सामंत यांची ही मागणी युजीसीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यासारखे असून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ चे उल्लघंन करणारा असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. त्याचप्रमाणे ही मागणी करताना मंत्री सामंत यांनी याबद्दल आपल्याला माहिती दिली नसल्याचाही आरोप केला आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात अंतिम परीक्षेचे महत्त्वही नमूद केले आहे. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेतल्यास त्याचा उच्च शिक्षणावर परिणाम होण्याची भीतीही वर्तवली आहे. तर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसई यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेताना सवलत दिली असल्याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले. तर त्याबरोबर युजीसीने लॉकडाऊन असतानाही परीक्षा कशा स्वरुपात घ्याव्यात, याबद्दलच्या सूचना दिल्या असल्याचे देखील यावेळी अधोरेखित केले आहे.
दरम्यान, मंत्री सामंत यांनी राज्यपालांनी दिेलेल्या सूचनांवर म्हटले आहे की, राज्यात परिस्थिती गंभीर असल्यानेच आपण युजीसीला पत्र लिहिेले आहे. मात्र, त्यात त्यांचा काही गैरसमज झाला असला तर तो आपण लवकरच दूर करू असे म्हटले आहे.