महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Governor Koshyari : राज्यपाल कोश्यारी दिल्लीत; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे विधान भोवणार? - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आज आणि उद्या असे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भगत सिंग कोश्यारी यांना दिल्लीत पाचारण केल्याची चर्चा आहे. यावेळी राज्यपाल नेकमे कोणाला भेटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

By

Published : Nov 24, 2022, 3:21 PM IST

मुंबई:महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आज आणि उद्या असे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांना दिल्लीत पाचारण केल्याची चर्चा आहे. यावेळी राज्यपाल नेकमे कोणाला भेटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व महाराष्ट्राच्या राज्यपालांना पदमुक्त करण्याच्या दृष्टीने काही पावले टाकणार का? अशा चर्चां रंगू लागल्या आहेत.

भाजपची ही कोंडी? :राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या चार - पाच दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये विरोधी पक्षांकडून आंदोलने सुरू आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांसह अन्य नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचेच कायम आदर्श आहेत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडळवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांनी मांडली आहे. पण गेल्या वर्षभरात काही ना काही वक्तव्यावरून राज्यपाल कोश्यारी हे अडचणीत आले आहेत. त्यांच्या विधानावरून भाजपाची ही कोंडी होत असल्याची कुजबूज सुरू असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यावर प्रतिक्रिया देणे सुद्धा आता अवघड झाले आहे.


काय म्हणाले होते राज्यपाल? :काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. 'शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले होते. यानंतर राज्यभर ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. तसेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी राज्यपालांचा विरोध केला. उदयनराजेंनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्रही लिहिले असून राज्यपालांना पदावरून दूर हटवले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


राज्यपालांवर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिका? :राज्यपाल कोश्यारी यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. दीपक जगदेव यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या घटनापिठाची स्थापना करावी आणि अनुच्छेद ६१ आणि १५६ अन्वये राज्यपालांना हटवण्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्य विधानमंडळाच्या अध्यक्षांनी घ्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा अवमान करून महाराष्ट्रात दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी चिथावणी देणाऱ्या राज्यपालावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ही या याचिकेत करण्यात आली आहे.


राज्यपालांना पदावरून दूर करा? :राज्यपालांकडून सातत्याने महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांनी यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता असा आरोप करत महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या राज्यपालांना पदावरुन मुक्त करा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यात आता राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर गेल्याने त्यांना पदमुक्त करण्याबाबत काही निर्णय होणार का याबाबतही चर्चा रंगली आहे. परंतु राज्यपालांच्या नवी दिल्ली दौऱ्याबाबत राजभवन कडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नसून अद्याप कार्यक्रम व भेटीगाठीचां तपशील ठरला नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details