मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला. मात्र, आता राज्यात अनेक ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असल्याने राज्य सरकारकडून अनलॉक (maharashtra unlock) करण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. "मिशन बिगिन अगेन"अंतर्गत राज्यातील निर्बंधासाठी स्तर निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारकडून आदेश काढण्यात आला आहे. तीन जूनला आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली होती. मात्र, हा निर्णय विचाराधीन असल्याचे सांगत राज्य सरकारकडून त्यांच्या घोषणेला बगल देण्यात आली. यानंतर 4 जूनला रात्री उशिरा अधिसूचना काढत राज्य सरकारने सोमवारपासून राज्यात अनलॉकची घोषणा केली आहे.
याबाबत 3 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक पार पडली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
कशा असणार आहेत स्तर (लेव्हल) ?
- पहिला स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के पेक्षा कमी. तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले
- दुसरा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के, ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान भरलेले
- तिसरा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले
- चौथा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के एवढा. तसेच ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर भरलेले
- पाचवा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले
हेही वाचाः-नागीन फेम अभिनेता पर्ल पुरीला अटक, १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याबाबत कारवाई
पहिल्या स्तरात काय सुरू राहणार काय बंद?
दुकाने, मॉल, थेटर, नाट्यगृह, हॉटेल, मैदाने, बगीचे, खासगी व शासकीय कार्यालय, चित्रीकरण पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहे. गॅदरिंग लग्नसोहळ्याला बंधने नसणार, अंत्यविधीसाठी देखील बंधने नाहीत. मिटिंग, बांधकाम कामे, शेतीची कामे, ई कॉमर्स सर्विस, जिम, सलुन, ब्युटी सेंटर, सार्वजनिक वाहतूक आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे सर्व पहिल्या स्तरात 100 टक्के सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र, आंतरजिल्हा प्रवासासाठी आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. तसेच पहिल्या स्तरात जमावबंदी हटवण्यात आलेली आहे.
दुसरा स्तर -
दुसऱ्या स्तरात अत्यावश्यक सेवेतील आणि इतर दुकाने पूर्णवेळ सुरू राहण्यास मुभा आहे. मॉल थेटर आणि हॉटेल हे 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. तर बगीचे, मैदान, शासकीय आणि खाजगी कार्यालय पूर्णता क्षमतेने खुली करण्याची मुभा देण्यात आली आहे. चित्रीकरणाला देखील पूर्णक्षमतेने परवानगी असेल. लग्नसमारंभासाठी हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती अनिर्वाय असणार आहे. अंत्यविधीला सामान्य क्षमतेने उपस्थिती असल्यास परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाच्या मिटिंगला 50 टक्के उपस्थिती ठेवण्यास मुभा आहे. बांधकाम कामे, शेतीची काम, ई-कॉमर्स ही शंभर 100 क्षमतेने सुरू राहतील. जिम, सलुन, ब्युटी पार्लर ते 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक आसन क्षमतेनुसार सुरू राहील. आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आणि आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. तर तिथेच मॅन्युफॅक्चरिंग युनिट पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यास मुभा असेल. हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहण्यास मुभा आहे.
तिसरा स्तर -
सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली राहण्यास मुभा आहे. मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद असतील. मैदाने आणि बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील. महत्त्वाची खाजगी कार्यालय चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तर शासकीय कार्यालय 50% उपस्थितीत सुरू राहण्यास मुभा आहे. लग्नासाठी केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी, महत्त्वाच्या मिटिंगसाठी 50% उपस्थिती, केवळ बांधकाम स्थळी काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना मुभा असेल. शेतीविषयक कामे चार वाजेपर्यंत करण्यास मुभा असेल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर पाच वाजेच्या नंतर संचारबंदी लागू होणार आहे. जिम, सलून आणि ब्युटी पार्लर सायंकाळी चार वाजेपर्यंत केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक आसन क्षमतेनुसार सुरू राहील.