मुंबई - राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येत्या 6 तारखेला 2020-21 चा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आज (सोमवारी) पहिल्याच दिवशी राज्य सरकारने २४ हजार ७२३ कोटींच्या जम्बो पुरवणी मागण्या सादर केल्या. यात सर्वाधिक 15 हजार कोटी रुपयांची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर राज्य शासनाने आतापर्यंत एकंदर २५ हजार कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत.
भाजप सातत्याने ठाकरे सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्याच दिवशी जम्बो पुरवणी मागण्या सादर करत ठाकरे सरकारने विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत २ लाख रुपये कर्जमाफ केले जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी येत्या मे महिन्याअखेर पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी नुकताच १० हजार कोटी इतका निधी आकस्मिकता निधीतून आगाऊ रक्कम उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानंतर आता पुरवणी मागण्यांमध्ये १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.