मुंबई -राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने लॉकडॉऊन 31 मेपर्यंत वाढवला आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज (रविवारी) यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज 17 मेला संपत आहे.
केंद्राने दिलेल्या निर्देशांचे पूर्ण पालन करण्यात येत आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याबाबतची पूर्तता करण्यासाठी राज्य प्रयत्नशील आहे. केंद्राकडेही पाठपुरावा सुरू असल्याचे मुख्य सचिव मेहता यांनी आदेशात नमूद केले आहेत.
लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्देश लॉकडाऊनमध्ये अर्थचक्र पूर्ण मंदावले आहे. उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यादरम्यान, केंद्राच्या निकषानुसार राज्यात 37 हजार उद्योग सुरू झाले आहेत तर 10 लाख कामगार रुजू झाले असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. मात्र, आता वाढवलेल्या लॉकडाउनमध्ये नेमके काय बदल केले जाणार आहेत, याबाबत पुढील आदेश येणे अपेक्षित आहेत.
केंद्र सरकारने रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमध्ये काही निकष निर्धारित केले आहे. रेड झोनमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. मात्र, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवाही सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी काही नियमांत शिथिलता येणे अपेक्षित आहे. तसेच राज्यांतर्गत वाहतुकीसंदर्भातही महत्वाचा निर्णय अपेक्षित आहे. त्याचबरोबर महसूल वाढवण्यासाठी मुद्रांक शुल्क व्यवहारही सुरू करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे.