मुंबई- कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीकेला होता. यावर आज महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यात शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस आणि मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला.
केंद्र सरकारने राज्यासाठी भरपूर निधी दिल्याचा दावा फडणवीस यांनी मंगळवारी केला होता. यावर अनिल परब म्हणाले, केंद्राने कोरोनासाठी कुठलाही विशेष निधी दिलेला नाही. त्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, 'कोरोना संकटात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील, असे वाटले होते. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आकडेवारी चांगली आहे. पण त्यात काहीच तथ्य नाही.'
नुसती खोटी आकडेवारी सादर करण्यापेक्षा आम्हाला साथ द्या. तसे झाले तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरणार नाही, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला. कोरोनाच्या संकटात ठाकरे सरकार चांगले काम करत आहे. सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत, असेही पाटील म्हणाले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, 'फडणवीस यांनी गुजरातची अवस्था किती बिकट आहे ते जरा पहावे. या संकटात मला गुजरातशी स्पर्धा करण्याची गरज वाटत नाही. पण महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधील स्थिती अत्यंत वाईट आहे. सद्या महाराष्ट्राने केलेल्या कामाचे अनुकरण देशातील इतर राज्य करू लागली आहेत. अशा वेळी फडणवीस यांनी राजकारण करु नये. त्यांनी उलट या कठीण काळात आम्हाला साथ द्यावी, अजूनही वेळ गेलेली नाही.'