मुंबई -शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन त्यांनी याबाबत माहिती दिली. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी आणि त्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
वर्षा गायकवाड यांचे एक स्वीय सहाय्यक नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे अहवाल मिळाले होते. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून मंत्रालयातील त्यांच्या दालनात अधिकारी वर्गामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर मंगळवारी सायंकाळी मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विट करुन दिली.
ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, 'आज माझ्या तपासणीदरम्यान मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या" असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, आता यानंतर मंत्रालयातील त्यांचे दालन येत्या काही दिवसात बंद ठेवले जाण्याची शक्यता आहे.
वर्षा गायकवाड यांच्या मंत्रालय शेजारी असलेल्या बंगल्यावर मागील काही दिवसात राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी वर्गाची मोठी वर्दळ सुरू होती. त्यातच बदल यांपासून इतर अनेक कामकाजासाठी राज्यभरातील अधिकारीही या बंगल्यावर ये-जा करत होते. त्याच पार्श्वभूमीवर येथील काही कर्मचाऱ्यांनाही ही कोरोनाची लागण झाली होती, असे समोर आले होते. त्यामुळे बंगल्यावर राहणाऱ्या अनेकांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत त्यांना स्वतःलाही कोरोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे. त्या येत्या काही दिवस आपल्या बंगल्यावर क्वारंटाईन होण्याची शक्यता आहे.
तर मागील आठवड्यातच शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना ही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांचा अद्यापही क्वारंटाईन पिरियड संपण्यापूर्वीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड याही कोरोना बाधित झाल्या आहेत. यामुळे येत्या काही दिवसात शालेय शिक्षण विभागाच्या अनेक महत्त्वाच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून व्यक्त केलीे जाते आहे.