मुंबई -शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांनी आवश्यक मात्रेत पाणी प्यावे यासाठी राज्यातील शाळांमध्ये वॉटर बेल उपक्रम सुरू केला जाणार आहे. शाळेच्या वेळात तीन वेळा पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी घंटा वाजवली जाणार आहे.
पाणी पिण्यासाठी शाळांमध्ये वाजणार आता 'वॉटर बेल'
विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सूचना मिळावी यासाठी वॉटर बेल नावाचा हा उपक्रम राबवला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांसाठी तसा शासन आदेश काढण्यात आला आहे. त्याचबरोबर याबाबत शिक्षण आयुक्तांनी सर्व शाळांकडून अहवाल मागवून घ्यावेत, अशी सूचनाही केली आहे.
वॉटर बेल या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी घंटा वाजवली जाणार आहे. शाळेच्या वेळापत्रकात तीन वेळा अशाप्रकारे घंटा वाजवण्यासाठी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेमध्ये वेळ निश्चित करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
पाणी पिण्यासाठी राखून ठेवलेल्या वेळेमध्ये मुलांना आवश्यकतेनुसार पाणी पिता येईल. त्यासाठीची मानसिकता तयार होईल. पाणी पिण्याची सवय होईल, यासाठीची काळजी घ्यावी, असे आदेशही शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.
मुलांच्या शरीरात पाण्याची खूप मोठी कमतरता असते. त्यामुळे अनेक आजारांना त्यांना सामोरे जावे लागते. शरीरात आवश्यक तेवढे पाणी न गेल्यामुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे मुलांनी दररोज सर्वसाधारणपणे दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असते. परंतु मुले पाणी पीत नाहीत अशी तक्रार पालकांकडून केली जाते. घरून भरून आणलेली पाण्याची बॉटल मुले तसेच घरी परत आणतात. पाणी कमी पिल्यामुळे थकवा येणे, मुतखडा, चिडचिडेपणा वाढणे आधी त्रास होण्याची शक्यता असते. यामुळे हा उपक्रम शालेय शिक्षण विभागाकडून राबवला जात असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.