मुंबई -बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आहे. ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर सामाजिक, राजकीय, सिनेसृष्टीसह सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. ऋषी कपूर यांच्या निधनानं निखळ आनंद देणारं, हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वं हरपलं, आशा शब्दात अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं. त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला. ‘कपूर’ कुटुंबाचा कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. काल इरफान खान यांचं निधन झाल्यानंतर आज ऋषी कपूर यांच्या निधनाची आलेली बातमी, हे खरोखरंच धक्कादायक, वेदना देणारं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.