मुंबई - लॉकडाऊनच्या काळात वीज बिलं जास्त आल्याच्या तक्रारी राज्यभरात सगळीकडे करण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांना या वीज बिलांचा चांगलाच 'शॉक' बसला.. अनेक नेते, पक्ष संघटनांनी वाढीव बिलांच्या विरोधात आंदोलने केली. मात्र, अद्याप वाढीव बिलांबाबत काय निर्णय होणार याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
लॉकडाऊनच्या काळात हाताला कामे नसताना भल्या मोठ्या वीज बिलांच्या आकड्यांनी नागरिक हैराण झाले. नागपुरात तर बील जास्त आल्याचे पाहुन एकाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटनाही घडली. भाजप, शेतकरी नेते राजू शेट्टी तसेच खासदार नवनीत राणांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही वीज बीले माफ करण्याच्या मागणीसाठी आंदोलने केली.
सरकारकडून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज बिलांचे दर सरकार ठरवत नसून राज्य वीज नियामक आयोग ठरवत असल्याचे सांगत अव्वाच्या सव्वा बिलांना नियामक आयोग जबाबदार असल्याचे सांगितले आहे. ग्राहकांचा खरा असंतोष दरवाढीच्या विरोधात असायला हवा, पण दरवाढ माहितीच नसल्याने बिलं चुकीची आली आहेत, असा संभ्रम निर्माण झाला असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले. वीज तज्ञ अविनाश प्रभुणे यांनी उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढल्याचे सांगत वीज दरांमध्येही वाढ झाल्याने बिलांचे आकडे मोठे आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वाढीव वीज बिलांबाबत जनतेला लवकर दिलासा देणारा निर्णय घेऊ, असे राज्य सरकारकडून आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात वीज बिलं कधी कमी होणार याबाबत कसलीच स्पष्टता नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये वीज बिलांबाबत संभ्रमावस्था कायम आहे.
हेही वाचा -खासदार संजयकाका पाटील यांना कोरोनाची लागण