मुंबई : 25 एप्रिल 1960 रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये अस्तित्वात आली. त्यानंतर 1 मे 1960 ला या संदर्भातील कायदा लागू झाला. नव्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती दरम्यान मुंबईला महाराष्ट्रात शामिल करून घेण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात संयुक्त महाराष्ट्र समितीचे सर्वाधिक योगदान आहे.
संयुक्त महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी :1908 सालच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव वैध यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र एकीकरणाचा उल्लेख केला होता. त्यांनी मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांचे एक वेगळे राज्य असावे, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी 1915 साली भाषावर प्रांतरचनेचा करण्याची मागणी लावून धरली. टिंळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रातून याचे महत्व आणि आवश्यकता जनतेला समजावून सांगितली. रामराव देशमुख जे वऱ्हाड आणि मध्य प्रांत विधिमंडळाचे प्रतिनिधी होते, त्यांनी 1 ऑक्टोबर 1938 साली ठराव मांडून वऱ्हाड प्रांत वेगळा करावा असे म्हटले. रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 1941 साली मुंबईत 'संयुक्त महाराष्ट्र सभा' या संघटनेची स्थापन झाली. पुढच्या वर्षी डॉ. टी. जे. केदार यांच्या नेतुत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्या आधी 1940 मध्ये वाकरणकर यांनी न. वि. पटवर्धन व धनंजयराव गाडगीळ यांच्यासह संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार केला. तर वेगळे विदर्भ राज्य व्हावे, असे लोकनायक बापूजी अणे यांचे मत होते.
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना: 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा घेतली गेली. या सभेत संयुक्त महाराष्ट्र समितीची एकमताने स्थापन झाली. त्यांनतर संयुक्त महाराष्ट्र समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार श्रीपाद डांगे यांची अध्यक्षपदी, डॉ. नरवणे यांची उपाध्यक्षपदी तर एस. एम. जोशी यांची जनरल सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्रासाठी आचार्य अत्रेंनी विविध वृत्तपत्रांतून जनजागृती करण्याचे कार्य केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले एक गीत (लावणी) संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रेरणा गीत बनले. ही लावणी अमर शेख या मुंबईच्या लालबावटा कलापथकातील शाहीरांनी गायली होती.
अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती! :संयुक्त महाराष्ट्रासाठी श्रीधर महादेव, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे, सेनापती बापट, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, शाहिर अमरशेख आदी लढवय्या नेत्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यांच्या या आंदोलनानंतर केंद्रातले नेहरु सरकार नरमले आणि संयुक्त महाराष्ट्राचा मार्ग मोकळा झाला. संयुक्त महाराष्ट्रापूर्वी 1937 साली बॉम्बे प्रॉविन्स म्हणजेच मुंबई इलाखा अस्तित्वात होता. सर धनजीशा बोमनजी कूपर हे बॉम्बे प्रॉविन्सचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 19 जुलै 1937 रोजी बाळ गंगाधर खेर बॉम्बे प्रॉविन्सचे मुख्यमंत्री झाले. 17 एप्रिल 1952 ते 31 ऑक्टोबर 1956 दरम्यान मोरारजी देसाई बॉम्बे प्रोविन्सचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळातच संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला होता. हे आंदोलन पेटले असताना केंद्राने द्विभाषिक राज्याचा घाट घातला. 1 नोव्हेंबर 1956 रोजी यशवंतराव चव्हाण हे या राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन करणाऱ्यांनी हार मानली नाही. अखेर दिल्लीने त्यांच्यासमोर गुडघे टेकले आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली.
हेही वाचा :Maharashtra Foundation Day History : मुंबई मिळवण्यासाठी केला होता मोठा संघर्ष; जाणून घ्या, महाराष्ट्र दिनाचा गौरवशाली इतिहास!