सायबर विभागाकडून लॉकडाऊनच्या काळात 407 गुन्हे दाखल, 214 आरोपींना अटक - मुंबईत सायबर गुन्हे
सध्याच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार आणि समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. काळात राज्यात 407 सायबर गुन्हे दाखल झाले असून 214 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सायबर क्राईम
मुंबई -लॉकडाऊनच्या काळात राज्यात 407 सायबर गुन्हे दाखल झाले असून 214 व्यक्तींना अटक केली आहे. टिक टॉक व अन्य सोशल माध्यमांवर सध्या महिलांवरील अत्याचार, अॅसिड अटॅक आणि बलात्काराच्या घटनांचे समर्थन करणारे पोस्ट शेअर केले जात आहेत. अशा समाजकंटकांच्या विरोधात सायबर क्राईम नजर ठेवून आहे. अशा विघातक लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.
नवी मुंबई खांदेश्वरमध्ये ई-पासच्या संदर्भात अफवा..
नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यासाठी e-pass मिळत आहेत व त्याकरिता तुम्ही एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावर एसएमएस करा व त्यात स्वतःचा मोबाईल क्रमांक देऊन पोस्ट टाकली होती . त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये अफवा पसरून संभ्रम निर्माण झाला. सध्या लॉकडाउनच्या व कोरोना महामारीच्या काळात बरेच लोक सोशल मीडियाचा जास्त प्रमाणात वापर करत आहेत. सोशल मीडियावर बऱ्याच पोस्टमधून, वेगवेगळी माहिती दिली असते. यातील काही माहिती आपल्या विचारसरणीशी मिळती जुळती असते. तर, काही विरोधात असते. अशा पोस्टवर रिअॅक्ट होण्याआधी किंवा सदर पोस्ट शेअर करण्याआधी त्याचे काय परिणाम होऊ शकतात, आपल्या कृतीने कुठल्या कायद्याचा किंवा नियमांचा भंग होणार नाही याची खात्री करा, असे आवाहन राज्याच्या सायबर क्राईम विभागाकडून करण्यात येत आहे.