महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समाज माध्यमांचा गैरवापर अराजकता माजवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा - गृहमंत्री देशमुख

काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेवून आहे.

गृहमंत्री देशमुख
गृहमंत्री देशमुख

By

Published : Apr 15, 2020, 7:58 AM IST

मुंबई - काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे.

कोविड-19 च्या साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान याचे प्रमाण वाढले आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरून भीती व द्वेष पसरविण्याच्या या प्रकारांवर महाराष्ट्र सायबर सेलने बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना श्री. देशमुख यांनी सायबर विभागाला दिल्या आहेत.

पोलिसांनी अशा लोकांविरुद्ध लॉकडाऊनच्या कालावधीत १७६ गुन्हे नोंदविले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये द्वेष-भाष्य व सांप्रदायिक गुन्ह्यांना पेव आल्याचं आकडेवारी वरुन लक्षात येतं. वरील १८३ गुन्ह्यांपैकी, समाज माध्यमांतून द्वेष-भाष्याचे ८७ गुन्हे आहेत. यामुळे ३७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ११४ जणांचा सदर गुन्ह्यांमध्ये हात असल्याची खात्रीदायक ओळख पटली आहे.

एकूण ताब्यात घेतलेल्यांपैकी ७ जणांविरुद्ध CrPC च्या कलम १०७ नुसार (समाज-शांती भंग करण्याचा प्रयत्न) नोंद आहे. सर्वाधिक केस (८८) व्हॉट्स ॲपच्या गैरवापराचे आहेत. त्या खालोखाल फेसबुक (४९) आहे. टिक-टॉक च्या गैरवापराचे ३ केसेस आहेत व ट्विटर संबंधित २ केसेस. सायबर सेल ने सर्व संबंधित समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्म्सना अशा पोस्ट्स काढून टाकायचे आदेश दिले आहेत. यातील ३२ पोस्ट्स काढून टाकण्यात यश आलं आहे. बाकी पोस्ट्स काढून टाकण्याची प्रक्रिया चालू आहे.


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व जनतेस आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या चुकीच्या पोस्ट समाज माध्यमांवर आढळून आल्यास त्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करावी. पोलीस विभाग अशा समाजकंटकांविरुद्ध तातडीने कारवाई करील .

ABOUT THE AUTHOR

...view details