महाराष्ट्रातील सुमारे 200-300 लोकांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना परत पाठवण्यात आले आहे. आता शांततापूर्ण परिस्थिती आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम्ही आंदोलन आणि निषेधांवरही लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती कर्नाटकचे कायदा आणि सुव्यवस्था एडीजीपी आलोक कुमार यांनी दिली.
Breaking News : महाराष्ट्रातील सुमारे 200-300 लोकांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला - Etv Bharat Maharashtra breaking news

22:27 December 20
महाराष्ट्रातील सुमारे 200-300 लोकांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला
21:53 December 20
हत्तीच्या आरोपातून गँगस्टर छोटा राजनची दोषमुक्तता, सत्र न्यायालयाचा निर्णय
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम च्या टोळीतील कथित हस्तकाची 1999 मध्ये हत्या केल्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष MCOCA कोर्टाने गँगस्टर छोटा राजन ला या प्रकरणातून दोषमुक्त केले आहे. या प्रकरणात दोष मुक्त करण्यात यावे याकरिता छोटा राजन च्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने छोटा राजन ला या प्रकरणातून दोष मुक्त केले आहे. यावर मुंबई सत्र न्यायालयातील संकेतस्थळावर 10 पानाची सविस्तर ऑर्डर आज उपलब्ध करण्यात आली आहे.
21:53 December 20
नशेसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या पत्नीला धावत्या रिक्षातून ढकलले
ठाणे - रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करणाऱ्या आणि नशेच्या अधीन गेलेल्या नशेडी पतीने आपल्या पत्नीला नशेसाठी पैसे मागितले. पगार झाल्यानंतर देते असे सांगणाऱ्या पत्नीलाच धावत्या रिक्षातून बाहेर फेकून देणारा नराधम पती फरार झाला आहे. तर गंभीर जखमी महिला कोपराच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पती-पत्नी दोघे वागळे इस्टेट मधील इंदिरा नगर परिसरात राहत असून वागळे पोलीस ठाण्यात मात्र पती याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
20:35 December 20
गोरेगावात १३ वर्षीय मुलीचा विनयभंग; एकाला अटक
मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील राम सागर पासवान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल, आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली, अशी माहिती दिंडोशी पोलिसांनी दिली.
19:53 December 20
चीन अमेरिकेला कोरानाचा पुन्हा विळखा, भारतात खबरदारीचे उपाय
नवी दिल्ली - चीन आणि अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे देशातही खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. सध्या देशात कोरोनाचे फारसे रुग्ण नाहीत, मृत्यूही बऱ्यापैकी कमी झाले आहेत. मात्र हा विषाणू पुन्हा जगभर पसरत असल्याने सरकार अलर्ट झाले आहे. नवीन व्हेरिएंट येत आहे का, ते जाणून घेण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी लोकांनी घाबरून जाऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे.
19:32 December 20
महाराष्ट्रात आज 20 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद, एकाचाही मृत्यू नाही
मुंबई - कोरोनाव्हायरसच्या आज 20 नवी रुग्णांची राज्यात नोंद झाली. त्यामुळे एकूण संख्या 81,36,368 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
18:57 December 20
छोटा राजनची 1999 च्या खून खटल्यातून निर्दोष मुक्तता
मुंबई - सत्र न्यायालयाने दाऊद इब्राहिम टोळीतील एका कथित सदस्याच्या 1999 मध्ये झालेल्या हत्येशी संबंधित गुंड छोटा राजनला दोषमुक्त केले आहे. न्यायालयाने 17 डिसेंबर रोजी राजनच्या मुक्ततेच्या याचिकेला परवानगी दिली होती. फिर्यादीनुसार, दाऊद टोळीचा कथित सदस्य अनिल शर्मा याला 2 सप्टेंबर 1999 रोजी उपनगरीय अंधेरी येथे राजनच्या माणसांनी गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणी राजनची कोर्टाने मुक्तता केली आहे.
18:54 December 20
१२ वर्षांच्या नातीच्या विनयभंग प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाला अटक
ठाणे - जिल्ह्यात एका 73 वर्षीय व्यक्तीला मंगळवारी त्याच्या अल्पवयीन नातीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.
18:50 December 20
पालघर जिल्ह्यात तीन हजार रुपयांची लाच घेताना पोलिसाला अटक
पालघर -जिल्ह्यातील एका पोलीस हवालदाराला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्याने तक्रारदाराच्या वडिलांविरुद्ध जारी केलेल्या न्यायालयीन वॉरंटची अंमलबजावणी न करण्यासाठी 3,000 रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
18:29 December 20
चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्यासंदर्भात 27 डिसेंबरला निर्णय
मुंबई -राज्याचे तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका खाजगी कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार त्यांच्यासह इतर सहआरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी होत आहे. त्यावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी करण्यात आली. आता या प्रकरणावर पुढील सुनावणी 27 डिसेंबर रोजी होणार आहे.
18:16 December 20
आंतरधर्मीय विवाहांना राज्य सरकारचा विरोध नाही - फडणवीस
नागपूर - आंतरधर्मीय विवाहांना राज्य सरकारचा कोणताही विरोध नाही. लव्ह जिहादवर इतर राज्यांमध्ये काही कायदे करण्यात आले आहेत. त्या सर्व कायद्यांचा अभ्यास करून गरज भासल्यास राज्य सरकार त्यावर निर्णय घेईल, जेणेकरून एकही महिला त्याचा बळी ठरू नये, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
17:48 December 20
राज्यात 699 सरपंच बिनविरोध, 63 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकही अर्ज नाही
मुंबई - राज्यात आता निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायती ७,६८२ आहेत. त्यामध्ये एकूण सदस्य संख्या- ६५,९१६ होती. त्यापैकी बिनविरोध विजयी सदस्य - १४,०२८ झाले. निवडणूक झालेल्या सरपंचपदांच्या एकूण जागा - ७,६१९ होत्या त्यातील बिनविरोध विजयी सरपंच- ६९९ झाले. तर ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.
17:42 December 20
जमीन वाटपाच्या निर्णयावरील वादाची चौकशी करा - आदित्य ठाकरे
नागपूर - शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना झोपडपट्टीवासीयांसाठीच्या जमिनी खासगी व्यक्तींना देण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
17:34 December 20
महिलांच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल - देवेंद्र फडणवीस
नागपूर - 'लव्ह जिहाद'च्या घटना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. लव्ह जिहादबाबत इतर राज्य सरकारांनी केलेल्या कायद्यांचा अभ्यास करून महिलांच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
17:21 December 20
प्लॉटवाटपावरुन उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
मुंबई - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विद्यमान मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना न्यायप्रविष्ट बाबीत हस्तक्षेप केल्याचा आरोप होत आहे. त्यावरुन परब यांनीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषदेत या प्रकरणाची विस्तृत माहिती दिली आणि या सर्व गोष्टींना एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचे ठासून सांगितले.
17:16 December 20
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाबद्दल मानले मतदारांचे आभार
नागपूर - ग्रामपंचायतीमधील यशाबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्वच मतदार आणि भाजपसह शिंदे गटाच्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
17:09 December 20
संजीव पालांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई - शंभर कोटी कथित वसुली प्रकरणी संजीव पालांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ते खासगी सचिव होते. मनी लॉन्ड्रीग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजीव पलांडे यांना दोन लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
16:45 December 20
पाचवी स्कॉर्पीन पाणबुडी 'वगीर' भारतीय नौदलात सामिल
नवी दिल्ली - प्रकल्प 75 अंतर्गत कलवरी प्रकारातील पाचवी पाणबुडी भारतीय नौदलात आज सामिल करण्यात आली. स्कॉर्पीन डिझाइनच्या सहा पाणबुड्यांचे स्वदेशी बांधकाम करण्यात येत आहे. या पाणबुड्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे मेसर्स नेव्हल ग्रुप, फ्रान्सच्या सहकार्याने बांधल्या जात आहेत.
16:30 December 20
येवला ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व
येवलातालुक्यातील नांदेसर, कोटमगाव बुद्रुक, आडगाव चोथवा,नायगव्हाण, कुसुर, चांदगाव, एरंडगाव खुर्द या सात ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहे. तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वर्चस्व बघायला मिळाले असून सात पैकी तीन ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गट वर्चस्व मिळवत एका ग्रामपंचायतीवर भाजप तर इतर ग्रामपंचायतवर सर्व पक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
16:27 December 20
पालघर जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हाती
पालघर जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हाती
भाजप - 11
राष्ट्रवादी - 4
बहुजन विकास आघाडी - 13
उ.बा . ठाकरे - 7
बाळासाहेबांची शिवसेना - 2
मनसे - 3
अपक्ष - 22
इतर - 1
16:27 December 20
ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे 305
ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे 305
जिल्हा भंडारा
एकुण ग्रामपंचायत- 135
शिवसेना - 00
शिंदे गट - 10
भाजप- 25
राष्ट्रवादी- 23
काँग्रेस- 25
इतर-52
16:12 December 20
अधिकारांचा गैरवापर केला नाही, न्यायालयाच्या टिप्पणी संदर्भात मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
नागपूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात तसेच न्यायालयाने केलेल्या टिप्पणी संदर्भात स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली आहे. त्यांची बाजू कशी कायदेशीर आहे हे पटवून देण्यासाठी पुराव्यानिशी मुख्यमंत्री मांडणी करत आहेत. अधिकारांचा गैरवापर केला नाही, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
15:41 December 20
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व; ४२ पैकी २० ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील थेट सरपंच पदासाठी ३४ ग्रामपंचायतीमध्ये ११४ उमेदवारांसह २१९ सदस्यांच्या जागांसाठी ६१३ उमेदवारांच्या अंतिम निकालात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे ४२ पैकी ६ ग्रामपंचाती बिनविरोध झाल्या, तर दोन ठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्या रिक्त आहेत. आज अंतिम निकालात सर्वाधिक २० ठिकाणी भाजपाचे पॅनल निवडून आले. तर शिंदे गटाचे १३ पॅनल, तसेच ठाकरे गटाचे ५ तर २ ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
15:40 December 20
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्द येथे भाजपाचे र्निविवाद वर्चस्व
जालना - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्द गावात 30 वर्षानंतर दानवेंचं वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांच्या भावजई सुमन मधुकर दानवे यांना यश आले. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुनिता संतोष दानवे यांचा दणाणून पराभव करत आपली परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवत 30 वर्षाची परंपरा कायम ठेवत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिष्ठा कायम ठेवली आहे.
15:40 December 20
पुण्याच्या मावळमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का, NCP 6 तर BJP 3 ठिकाणी विजयी
पुण्याच्या मावळ तालुक्यात नऊ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. मावळमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नऊ पैकी शिरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली तिथं राष्ट्रवादीने विजयाचा झेंडा रोवला. आठ ग्रामपंचायतीची मतमोजणी आज होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ यश मिळालं आहे. तर,भाजपा केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. मावळमधील भोयरे आणि निगडी या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या उमेदवाराला प्रचार केला होता. पैकी भोयरे येथे त्यांना विजय मिळाला तर निगडी येथे पराभव झाला आहे.
15:21 December 20
उमेश कोल्हे यांची हत्या दहशत निर्माण करण्यासाठी - एनआयए
उमेश कोल्हे खून प्रकरणात आरोपींनी केलेले कृत्य ही केवळ साधी हत्या नसून धार्मिक कट्टरपंथी मुस्लिम तरुणांनी लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी रचलेल्या सुनियोजित गुन्हेगारी कटाचे दहशतवादी कृत्य आहे, असे आरोपपत्रात NIA ने म्हटले आहे. इतरही अनेक आरोप या आरोपपत्रात केले आहेत.
15:16 December 20
महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा करा - उदयनराजे भोसले
सातारा -खा. उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा करा अशी मागणी केली आहे. त्यांनी अलिकडच्या काळात महापुरुषांचा अपमान झाल्यासंदर्भातील काही उदाहरणे या पत्रात दिली आहेत. त्याबद्दल खंत व्यक्त करुन कायद्याने त्यावर चाप आणला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
15:11 December 20
आफताबचे ७० तुकडे करण्याचा कायदा असायला पाहिजे होता - अजित पवार
नागपूर - आफताब पूनावालाला फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे. त्यासाठी लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी राज्यसरकारने केंद्राला साकडे घालावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. आपताबने श्रद्धाचे ३५ तुकडे केले, आपल्याकडे असा कायदा पाहिजे होता की त्याचे 70 तुकडे केले पाहिजेत. अशीटी टिप्पणी पवार यांनी केली. तर सगळ्यांना समाधान वाटेल असा हा नालायक माणूस निघाला आहे, या शब्दात पवारांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.
15:02 December 20
पुणे शहर व परिसरातील 'कोयता गँग'च्या गुंडांची दहशत रोखा - अजित पवार
नागपूर -पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारखे हिंसक कारवाया करते. राज्यातल्या अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत. कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.
14:32 December 20
क्लबच्या पाचव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबई - दक्षिण मुंबईतील एका क्लबच्या पाचव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंब फिफा विश्वचषक फायनल पाहण्यासाठी गेले होते. रविवारी संध्याकाळी तो वॉशरूममधून परतत असताना मजल्यावरील रेलिंगमधील फटीतून तो घसरला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
14:25 December 20
गँगस्टर सुकेश चंद्रशेखर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस कोर्टात पहिल्यांदाच आमनेसामने
नवी दिल्ली - गँगस्टर सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस पतियाळा कोर्टात हजर झाले. आरोपांनंतर पहिल्यांदाच जॅकलिन आणि सुकेश या प्रकरणाबाबत समोरासमोर दिसले. सुकेश हा या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. 200 कोटींची फसवणूक झालेल्या पीडितेला पहिला कॉल लँडलाइनवरून आला होता. जे सुकेशने केले होते. या प्रकरणात सुकेशने आदिती सिंह यांच्याकडून 57 कोटी घेतल्याचे मान्य केले होते, परंतु तपासात पोलिसांना ही रक्कम 80 कोटी असल्याचे आढळून आले.
14:18 December 20
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर विधानसभेत चर्चा झाली पाहिजे - आदित्य ठाकरे
नागपूर -आम्हाला कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर विधानसभेत चर्चा हवी आहे, अशी मागणी आ. आदित्य ठाकरे यांनी केली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले हे जाणून घ्यायचे आहे, असे ते म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री या मुद्द्यावर आक्रमक आहेत, पण भीतीपोटी आमचे मुख्यमंत्री यावर बोलू इच्छित नाहीत असा टोला ठाकरे यांनी लगावला.
13:32 December 20
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात गुन्हे रद्द करण्याची भुजबळ यांची मागणी
मुंबई - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याकरिता भुजबळ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. ईडी च्या वतीने तीन महिन्यानंतर उत्तर दाखल केल्याने भुजबळ यांच्या वकिलाने सर्वोत्कृष्ट उत्तर दाखल केल्याने ईडीचे आभार मानले. प्रमुख गुन्ह्यातून क्लीनचीट मिळाल्याने ईडीकडून दाखल केलेला गुन्हा पी एम एल ए कोर्ट खटला चालू शकत नाही अशी भुजबळांकडून मागणी करण्यात आली.
13:13 December 20
देशमुखांच्या जामिन स्थगितीची मुदत वाढवण्यासाठी सीबीआयची उच्च न्ययालयात धाव
मुंबई - माजी गृहमंत्री यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सीबीआय पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज करणार केला आहे. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारला आहे. त्यावर उद्या सुनावणी होईल. उच्च न्यायालयाने जामीनाला दिलेली 10 दिवसांची स्थगिती वाढवून देण्यची विनंती या अर्जामध्ये आहे. जर निकाल दिल्यानंतर 10 दिवसांच्या आत ही सुनावणी झाली नाही, तर देशमुखांचा जामीन लागू होऊन त्यांची कारागृहातून सुटका करावा लागेल.
12:57 December 20
१८ वर्षीय मुलीचे तिच्या वडिलांसमोरून अपहरण
सिरिल्ला (तेलंगाणा) - सिरिल्ला जिल्ह्यात एका १८ वर्षीय मुलीचे तिच्या वडिलांसमोरून अपहरण करण्यात आले. ते मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
12:51 December 20
एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच्या सरकारमध्ये घेतलेल्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे
नागपूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झोपडपट्टीसाठी जमीन देण्याच्या मागील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना घेतलेल्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यामुळे मोठा झटका बसला आहे.
12:17 December 20
हायकोर्टाने ताशेरे ओढल्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर - विधानपरिषदेत पुन्हा गदारोळ झाला आहे. हायकोर्टाने मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत असा विरोधकांना आरोप केला. मुख्यमंत्री नगरविकास मंत्री असताना 83 कोटीचे भूखंड 2 कोटीत विकले आहेत, असे सांगण्यात आले. पदाचा दुरुपयोग केला, असे न्यायालय म्हणतंय असा दाखला यावेळी विरोधकांना दिला. झोपडपट्टीसाठी राखीव भूखंड हस्तक्षेप करून विकला, असाही आरोप यावेळी केला गेला. त्यामुळे पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. हे सर्व आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी फेटाळून लावले.
12:06 December 20
मार्च महिन्यात निवडणुका लागतील त्या दृष्टीने कामाला लागा - राज ठाकरे
मुंबई - मार्च महिन्यात निवडणुका लागतील त्या दृष्टीने कामाला लागा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. पदवीधर मतदार नोंदणी जास्तीत जास्त संख्येने करा, असेही ते म्हणाले. लवकरच पक्षाच्या घे भरारी अभियानाचे वेळापत्रक जाहीर होईल. घे भरारी अभियान १०० टक्के यशस्वी व्हायला पाहिजे अशी सूचना राज ठाकरेंच्या बैठकीत करण्यात आली.
12:01 December 20
मुंबई महालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या विविध घोषणा
नागपूर - मुंबई महापालिका औषध खरेदीची चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईत 5500 आशा वर्कर्सची भरतीही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत याबाबतची घोषणा केली.
11:58 December 20
महाविकास आघाडीच्या आमदारांची विधानसभेबाहेर निदर्शने
नागपूर - महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज नागपुरात विधानसभेबाहेर राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. विद्यमान सरकार भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आल्याची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या सरकारने त्वरित पायउतार व्हावे अशी सदस्यांची मागणी होती.
10:03 December 20
विधिमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक सुरू
विधिमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. बैठकीला माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचा नेते व आमदार उपस्थित आहेत.
09:26 December 20
ताजमहालला मिळाली नोटीस, काय आहे कारण?
ताजमहालकडील थकित मालमत्ता आणि पाणी करापोटी पुरातत्व विभागाला नोटीस बजाविण्यात आली आहे. ताजमहालकडे सुमारे 1.40 लाख रुपये आहे आणि पाणी कर सुमारे 1 कोटी रुपये थकित आहे.
09:01 December 20
हिवाळी अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार?
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक आज रणनीती आखणार आहेत.
07:15 December 20
केंद्र सरकारकडून अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा विकास सुरू
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी केंद्र सरकार अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा विकास करत आहे.
07:14 December 20
समलैंगिक विवाह कायद्याला भाजपचा विरोध
भारतात, समलैंगिक विवाह हा मुस्लिम वैयक्तिक कायदा किंवा कोणत्याही संहिताबद्ध वैधानिक कायद्यांसारख्या कोणत्याही संहिता नसलेल्या वैयक्तिक कायद्यामध्ये मान्यताप्राप्त किंवा स्वीकारलेले नाहीत. समलिंगी विवाहामुळे देशातील वैयक्तिक कायद्यांचा नाजूक संतुलन बिघडेल, असे भाजप खासदार सुशील मोदी यांनी काल राज्यसभेत सांगितले.
06:35 December 20
सरकारी अधिकार्यांसाठी ट्विटरकडून करड्या रंगाचे टिक
सरकारी अधिकार्यांसाठी ट्विटरने करड्या रंगाचे टिक आता लाईव्ह केले आहे. पंतप्रधान मोदींस विविध देशांच्या पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांना हे टिक मिळाले आहे.
06:34 December 20
मुंझ मार्ग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
शोपियान जिल्ह्यातील मुंझ मार्ग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे.
06:22 December 20
Breaking News : शिक्षण सुविधांवरील खर्चाची रक्कम शिल्लक
मुंबई : केंद्राने दिलेल्या अनुदानाच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने केवळ 283 कोटी रुपयांची विशेष तरतूद केली होती. यामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठे यातील साधन व इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा यासाठी हा निधी खर्च करायचा होता. मात्र महाराष्ट्र शासन 93 कोटी खर्च करू शकले नाही. ही माहिती दस्तूर खुद्द महाराष्ट्राच्या बाबत ऑडिट रिपोर्टमधून समोर आलेली आहे.