मुंबई - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) शिखर परिषदेच्या (Apex Council) सदस्य आणि विविध पाच पदाधिकाऱ्यांच्या पदांसाठी २ ऑक्टोबर २०१९ ला मतदान होणार आहे. याच दिवशी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे, याची घोषणा निवडणूक अधिकारी तथा माजी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.
देशातील सर्व राज्य अथवा विभागांच्या क्रिकेट असोसिएशनच्या शिखर परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून माजी राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने दिले होते. त्या अनुषंगाने सहारिया यांची या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
सहारिया यांनी सांगितले, की 'शिखर परिषदेच्या एकूण १८ सदस्य आणि विविध ५ पदाधिकाऱ्यांच्या विविध पदांसाठी ही निवडणूक होत आहे. शिखर परिषदेच्या सदस्य पदासाठी २८ सप्टेंबर २०१९ला सकाळी ११ पासून २९ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यांची छाननी ३० सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. छाननीनंतर त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन तासांचा अवधी असेल.'