मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना पसरू लागला असल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडत असून नुकतेच निदान झालेल्या रुग्णांची संख्या 800 च्या वर पोहचली आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना दुसरीकडे तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 1.82 टक्के इतका आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण :दिलासादायक म्हणजे, राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. रोज सुमारे 500 रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. राज्यात आत्तापर्यंत 79 लाख 94 हजार 545 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या सुमारे 3900 सक्रिय रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत असून त्यांची संख्या 1244 आहे. त्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात 703, पुणे जिल्ह्यात 761 रुग्ण तर नागपूर जिल्ह्यात 152 सक्रिय रुग्ण आहेत. रायगड जिल्ह्यात 255 सक्रिय रुग्ण आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण :कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेतराज्य सरकारने तातडीची उपाययोजना म्हणून मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. विमानतळावर सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत असून दोन टक्के प्रवाशांचे नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे चाळीस हजार प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे.
मास्क वापरण्याचे आवाहन : आतापर्यंत विमानतळावर आढळलेल्या 58 रुग्णांपैकी सर्वाधिक 12 रुग्ण मुंबईतील आहेत, तर पुण्यातील 11 रुग्ण आहेत. नवी मुंबई, अमरावती, सांगली, औरंगाबाद, सातारा, नागपूर येथील प्रत्येकी एक रुग्ण असून 6 रुग्ण गुजरात तर 5 रुग्ण उत्तर प्रदेशातील आहेत. बाकी रुग्ण अन्य राज्यातील आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात पुन्हा एकदा खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांनी काळजी म्हणून मास्क वापरायला हवे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. मात्र अद्यापही मास्क सक्ती करण्यात आलेली नाही.
हेही वाचा :Gautami Patil : 'लोककलेची गौतमी करू नका, अन्यथा..', तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली खंत