मुंबई -'गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाचा प्रसार सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या तीन व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट घेऊन आलेला डेल्टा व्हेरिएंट, तसेच त्यात बदल झालेला डेल्टा प्लस व्हेरिएंट हा गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूपेक्षा अधिक गतीने पसरतो. कोरोनापेक्षा तो ५० टक्क्यांहून अधिक वेगवान आहे', अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तर डेल्टा प्लस हा हवेतून गर्दीच्या ठिकाणी आणि बंद खोलीत पसरतो, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - covid-19 restrictions
22:14 June 28
सावधान! डेल्टा प्लस अधिक वेगवान, बंद खोलीतही पसरतो; काळजी घेण्याची गरज
22:04 June 28
Mumbai corona Update : 714 रुग्णांना डिस्चार्ज.. 608 नवे रुग्ण, 18 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत आज 608 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 20 हजार 964 वर पोहचला आहे. आज 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 414 वर पोहचला आहे. आज 714 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 94 हजार 796 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 8 हजार 453 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 728 दिवस इतका आहे.
20:55 June 28
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत चार लाख लोक बाधित
मुंबई -मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन लाटा आल्या. दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबईमधील ४ लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या १० हजार ५०० जणांना तर दोन्ही डोस घेतलेल्या फक्त २६ जणांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी लसीकरण आवश्यक आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे.
20:54 June 28
पावसाळी अधिवेशन : विधानभवनात प्रवेशासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य
मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत ५ आणि ६ जुलै हे दोन दिवस चालणार आहे. विधानभवनात येणाऱ्या प्रत्येकाला आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. विधान भवनात आज उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने दिली.
दोन्हीही सभागृहांचे सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि वाहनातून मुंबईत येणारे सहप्रवासी अशा सर्वांनी सोयीच्या ठिकाणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये दिनांक ३ किंवा ४ जुलै, २०२१ या निर्धारित वैध कालावधीसाठीची RT-PCR चाचणी करून त्याचा अहवाल विधानभवन प्रवेशासाठी सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. लसीकरणातील पहिला वा दुसरा डोस घेतलेल्यांना तसेच कोविड-१९ संदर्भातील प्रतिपिंड (अँटीबॉडी) चाचणीचा सकारात्मक अहवाल असणाऱ्यांना सुध्दा RT-PCR चाचणी करणे अनिवार्य राहणार आहे.
16:15 June 28
गर्दी करू नका.. त्रिसूत्री पाळा; दुसरी लाट उलटण्याचा धोका, मुख्यमंत्र्यांकडून भीती व्यक्त
मुंबई - राज्यात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट आली. सध्या ही लाट ओसरत आहे. मात्र, नागरिकांनी त्रिसुत्री नियमांचे पालन न केल्यास ही लाट उलटण्याचा धोका अधिक आहे, अशी भिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मालाड येथील कोविड रुग्णालयाचे अनावरण मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
16:14 June 28
मुंबईमधील ५८ टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज
मुंबई -मुंबईतील ५८ टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. मे आणि जून महिन्यात करण्यात आलेल्या सेरो सर्वेमधून ही बाब उघड झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान हा सर्व्हे करण्यात आला होता. ६ ते १८ वयोगटातील मुलांचा यामध्ये सहभाग करून घेण्यात आला होता. मुंबई महापालिकेच्या २४ विभागात हा सर्व्हे करण्यात आला होता.
14:59 June 28
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46 हजार रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट 96.80 वर
नवी दिल्ली - देशातील नव्या कोरोना रुग्णांचे दैनंदिन प्रमाण आता एक लाखाच्या खाली आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ही अद्यापही वाढत असल्याचे दिसत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. यातच भारतात गेल्या 24 तासांत 46,148 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. तर 979 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत 58,578 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
12:02 June 28
पुण्यात कडक निर्बंध; सोमवारपासून दुपारी चारनंतर दुकाने, हॉटेल बंद
पुणे -कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरीएन्टचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहर आणि परिसरात आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना आजपासून (सोमवारपासून) नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. या नवीन नियमानुसार दुपारी चारनंतर पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.
06:46 June 28
'कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटशिवाय डेल्टा प्लसही चिंताजनक'
नवी दिल्ली - 'कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत जास्त वेगाने पसरतो, असा आतापर्यंत कोणताही अहवाल पुढे आलेला नाही. तरीही डेल्टा व्हेरिएंटला गांभीर्याने घेतले पाहिजे', असे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) माजी मुख्य वैज्ञानिक डॉ. रमन आर. गंगाखेडकर यांनी शनिवारी (26 जून) म्हटले.
06:44 June 28
'डेल्टा प्लस व्हेरिएंट'चा धोका: राज्यात पुन्हा निर्बंध; पाहा, काय सुरू काय बंद
मुंबई - देशात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे 40 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 21 रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. हे नवे निर्बंध सोमवारपासून (दि. 28 जून) लागू होणार आहेत. जाणून घ्या उद्यापासून राज्यात कुठे काय राहणार सुरू....
06:08 June 28
मालाड येथे २ हजार १७० बेडचे जम्बो कोविड सेंटर, आज होणार लोकार्पण
मुंबई- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे. आवश्यक यंत्रणा सुविधांसह सज्ज ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणून मालाड येथे २ हजार १७० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये १ हजार ५५० ऑक्सिजन बेड, १९० आयसीयू आणि पेडियाट्रिक वॉर्डमध्ये २५० बेड उपलब्ध असणार आहेत. या जम्बो कोविड सेंटरचे सोमवारी (दि. 28 जून) लोकार्पण होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.