मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा लवकरच राजीनामा देणार आहेत. तर त्यांच्या ठिकाणी तरुण मंत्री म्हणून परिचित असलेले काँग्रेसचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची वर्णी लागणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेत बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात लोकसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काँग्रेसला आपले पाळेमुळे मजबूत करण्यासाठी मोठे यश आले.
कामाचा व्याप वाढल्याने जबाबदारी दुसऱ्याकडे-
थोरात यांची पक्षबांधणीसाठीची कामगिरीही ही अत्यंत चांगली राहिली असली तरी सध्या त्यांच्याकडे राज्याचे महसूल मंत्री पद आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद अशा दोन जबाबदारी असल्याने त्यांच्याकडे कामाचा व्याप जास्त आहे.लक्षात घेऊन त्यांचे हे प्रदेशाध्यक्षपद काढून घेऊन इतरांवर सोपवले जाणार आहे. यासाठी काँग्रेसच्या दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी हे प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यासंदर्भात चर्चा सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.