मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक चक्र सुरू ठेवण्यासाठी नियोजनबध्द काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिल्या. भारतीय औद्योगिक महासंघ अर्थात सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
आर्थिक चक्राच्या दृष्टीने नियोजन
राज्यात कोविडचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काळात तिसरी लाट येईल, अशी भिती वर्तवली जात आहे. ही बाब विचारात घेत, राज्यातील वैद्यकीय यंत्रणांनी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे. तसेच गर्दी टाळण्यासाठी निर्बंध कडक लागू करावेत. तसेच आर्थिक चक्र सुरू ठेवण्याच्या दृष्टीने कोविड फोर्स तातडीने स्थापन करावा. याशिवाय उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था तयार करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीला यांची उपस्थिती
उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास या बैठकीला उपस्थित होते. तर सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेस्वानी, अश्विन यार्दी, राशेष शहा, केशव मुरुगेश, भारत पुरी, असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, डी के सेन, सुलज्जा फिरोदिया मोटवाणी, शरद महिंद्रा आदि उद्योगपती सहभागी झाले होते.
मागील चोवीस तासात 'इतक्या' नव्या कोरोना रुग्णांची भर