मुंबई- कोरोना उपाययोजनांवर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यात मुंबईतील खासगी रुग्णालयांनी 80 टक्के बेड्स राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे, यासाठी सर्व रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण ठेवावे व रुग्णांची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
पालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी गेल्या काही दिवसांत मुंबईत बेड्स व इतर साधन सामग्रीची कशी वाढ करण्यात आली आहे आणि यामुळे संक्रमण रोखण्यात आपल्याला कसे यश मिळत आहे, असे सांगितले. प्रत्येक बेडला युनिक आयडी देणार, डायलिसीस रुग्णांना उपचार मिळणार, प्रयोगशाळांना 24 तासांत चाचणी अहवाल देणे बंधनकारक करणार, असे सांगून आयुक्त चहल म्हणाले की, मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग 19 दिवसांवर गेला आहे. कोविडयोद्धा म्हणून डॉक्टर्स, परिचारिका पुढे येत आहेत. 3 हजार 750 डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यासाठी उतरत आहेत. 450 डॉक्टर्सपैकी 60 जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मुंबईत सध्या 21 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. आजमितीस देशाच्या एकूण रुग्ण संख्येच्या 35.23 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. देशाच्या तुलनेत 31.19 टक्के रुग्ण सुधारण्याचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात मृत्यू दर 3.37 टक्के असून देशाचा मृत्यू दर 2.82 टक्के आहे. जगात दर दहा लाख लोकांमागे 778 मृत्यू असताना महाराष्ट्रात हे प्रमाण 48 इतके आहे. सद्य घडीला महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये मृत्यू दर 6.18 टक्के, पश्चिम बंगाल मध्ये 5.6 टक्के, मध्य प्रदेशात 4.32 टक्के इतका जास्त आहे. एकवेळेस राज्यातील मृत्यू दर 7.5 टक्के होता तो कमी होऊन 3.37 टक्के इतका खाली उतरला आहे.
राज्यातील 30 ते 40 वयोगटात कोरोना लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 40 टक्के तर 40 ते 50 वयोगटात ते 18 टक्के आहे. 50 ते 60 वयोगटात ते 16.5 टक्के आहे. मृत्यू पावलेल्या 32 टक्के रुग्णांना इतर कोणतेही आजार नव्हते. 67 टक्के लोकांमध्ये इतर आजारही होते. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 41.33 टक्के तर ठाण्यात 36.59 टक्के आहे.