मुंबई - देशभरामध्ये कोरोना विषाणूनाचा प्रसार झाला आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वांत जास्त प्रकोप पाहायला मिळत आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना साथीच्या आजाराने ग्रस्त लोकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत, रक्त आणि प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट आहे. या संकटात कोणीही कार्यालयात किंवा 'मातोश्री' निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच वाढदिवसाला कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये. त्याऐवजी नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. मोठ्या प्रमाणावर रक्तदान, प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले आहे.