मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिवगर्जना अभियानासाठी राज्याभर दौरा करणार आहेत. आज खासदार संजय राऊत कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. ही बनावट शिवसेना आहे तसेच ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यानंतर त्यांच्या विधानावरून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ झाला. दरम्यान, आजचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले. खासदार राऊतांच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत.
संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध - उपमुख्यमंत्री फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांच्या विरोधात भावना तीव्र आहेत. कोणी कोणाला चोर मंडळ म्हणत असेल तर घरी गेलेले बरे. राऊतांनी केलेला आरोप हा सत्ता पक्षावर नाही तर विधिमंडळावर केलेला आरोप आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या सारखे मोठे नेते या विधिमंडळ होऊन गेले. देशातील सर्वोच्च विधिमंडळ मंडळ मानले जाते. अधिवेशना दरम्यान विधिमंडळात वेळोवेळी सत्ताधारी - विरोधक भूमिका मांडतात. विधिमंडळावर बोलले तर कारवाई होते. हजारो संजय राऊत विधिमंडळाचा अवमान करतील. सरकार म्हणून काहीही मागणी करणार नाही. व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असला तरी अपमान खपवून घेणार नाही, यामुळे राऊतांच्या या विधानाचा आम्ही निषेध करतो.
राऊतांना आमच्या ताब्यात द्या- आमदार नितेश राणे
भाजप आमदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करायला हवी, अशी मागणी केली. कारवाई केली गेली नाही तर संजय राऊत यांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना समज देऊ, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्याकडून वारंवार विधिमंडळाचा अपमान केला जातो. ते स्वतः खासदार असून असे वक्तव्य ते कसे करू शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच राज्य सरकारने संजय राऊत यांची सुरक्षा काढून टाकली पाहिजे, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
आदित्य आणि उद्धव ठाकरे चोर का? - आमदार संजय शिरसाठ
संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचा असून विधिमंडळाचे सदस्य उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील सदस्य आहेत. संजय राऊत बोलत असतील तर त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील चोर आहेत का? असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी उपस्थित केला. संजय राऊत हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात. मात्र यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत गंभीर आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना उपचाराची गरज असल्याचे देखील संजय शिरसाठ यावेळी म्हणाले. तसेच पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र आता ते पुन्हा जेलमध्ये जावे त्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करू, असा इशारा संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
अधिवेशनाचे कामकाज तहकूब: संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले.संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे विधान परिषदेच्या सदस्यांनी गदारोळ केला. यामुळे दहा मिनिटे विधान परिषद तहकूब करण्यात आली. तर, विधानसभेतही संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले.